Rashmi Mane
PM SETU ही केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे. देशातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणजेच ITI अधिक सक्षम, आधुनिक आणि उद्योगाभिमुख करण्यासाठी ही योजना राबवली जात आहे. 60,000 कोटी रुपयांच्या निधीतून कौशल्य विकासाला नवे बळ दिले जाणार आहे.
देशातील तरुणांना आजच्या आणि भविष्यातील उद्योगांच्या गरजेनुसार कौशल्ये देणे हा या योजनेचा उद्देश आहे. ITI च्या जाळ्याचे आधुनिकीकरण करून भारतीय तरुणांना जागतिक रोजगार बाजाराशी जोडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
या योजनेअंतर्गत देशभरातील 1,000 सरकारी ITI चे रूपांतर अत्याधुनिक संस्थांमध्ये केले जाणार आहे. यामुळे प्रशिक्षणाची गुणवत्ता आणि रोजगाराच्या संधी दोन्ही वाढतील.
योजनेत 200 ITI ‘हब’ म्हणून आणि 800 ITI ‘स्पोक’ म्हणून विकसित केले जातील. हब संस्था मार्गदर्शक आणि प्रगत प्रशिक्षण केंद्र म्हणून काम करतील, तर स्पोक संस्था स्थानिक पातळीवर कौशल्य प्रशिक्षण देतील.
या ITI संस्था सरकारच्या मालकीच्या राहतील. मात्र त्यांचे व्यवस्थापन उद्योग क्षेत्रातील भागीदारांकडे दिले जाईल. त्यामुळे प्रशिक्षण थेट बाजाराच्या गरजेनुसार दिले जाईल आणि परिणामाधारित कौशल्य विकास होईल.
अपग्रेड झालेल्या ITI मध्ये आधुनिक इमारती, अद्ययावत अभ्यासक्रम, डिजिटल शिक्षण प्रणाली आणि स्टार्टअपसाठी इन्क्यूबेशन सुविधा असतील. यामुळे विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाशी जोडलेले शिक्षण मिळेल.
हब ITI मध्ये नवकल्पना केंद्र, प्रशिक्षकांसाठी विशेष प्रशिक्षण आणि विद्यार्थ्यांसाठी प्लेसमेंट सेवा उपलब्ध असतील. त्यामुळे प्रशिक्षणानंतर थेट नोकरी मिळण्याची शक्यता वाढेल.
या योजनेसाठी जागतिक स्तरावर आर्थिक मदत मिळणार आहे. जागतिक बँक आणि एशियन डेव्हलपमेंट बँक यांच्या सह-वित्त सहाय्यामुळे प्रकल्पाला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळेल.