Rashmi Mane
LPG सिलिंडरऐवजी घराघरात पाइपद्वारे गॅस पोहोचवण्याला केंद्र सरकारने वेग देण्याचा निर्णय घेतला आहे. 1 सप्टेंबरपासून सिटी गॅस कंपन्यांना नवीन घरगुती PNG कनेक्शन वाढवण्यासाठी अतिरिक्त स्वस्त गॅस उपलब्ध करून दिला जाणार आहे.
निश्चित लक्ष्यापेक्षा जास्त नवीन घरगुती PNG कनेक्शन देणाऱ्या पात्र कंपन्यांना प्रत्येक कनेक्शनमागे अतिरिक्त 200 SCM घरगुती नैसर्गिक गॅस मिळणार आहे. ही योजना दोन टप्प्यांत राबवली जाणार असून प्रत्येक टप्पा सहा महिन्यांचा असेल.
स्वस्त घरगुती गॅस उपलब्ध झाल्यामुळे सिटी गॅस कंपन्यांना महाग LNG खरेदीवरील अवलंबित्व कमी करता येईल. त्यामुळे PNG नेटवर्क विस्तारासाठी केलेली गुंतवणूक कंपन्यांसाठी अधिक फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे.
सरकारच्या अंदाजानुसार, PNG नेटवर्कमध्ये केलेली गुंतवणूक वसूल करण्याचा कालावधी सुमारे 10 वर्षांवरून तीन वर्षांपर्यंत कमी होऊ शकतो.
देशात सध्या 1.74 कोटींहून अधिक घरगुती PNG कनेक्शन आहेत. पाइपद्वारे गॅस मिळत असल्याने ग्राहकांना सिलिंडर बुकिंग, डिलिव्हरीची प्रतीक्षा किंवा साठवणुकीची चिंता राहत नाही.
अलीकडील LPG पुरवठ्याच्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर PNG नेटवर्क विस्ताराला सरकारकडून प्रोत्साहन दिले जात आहे. मार्चपासून आतापर्यंत 5 लाखांहून अधिक नवीन PNG कनेक्शन देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
नवीन कनेक्शन वाढवण्यासोबतच आधीपासून असलेली मात्र वापरात नसलेली PNG कनेक्शन पुन्हा सक्रिय करण्यावरही भर दिला जाणार आहे. सोसायट्यांमध्ये PNG वापर वाढवण्यासाठी जनजागृती मोहीमही राबवली जात आहे.
PNG ग्राहकांना गॅस मीटरनुसार बिल भरावे लागते आणि सिलिंडरसारखे वारंवार बुकिंग करावे लागत नाही. त्यामुळे सरकारच्या या निर्णयामुळे देशातील PNG नेटवर्क आणखी विस्तारण्याची शक्यता असून LPG वरून PNG कडे जाणाऱ्या ग्राहकांची संख्या वाढू शकते.