Rajanand More
मेघालय राज्याचे माजी मुख्यमंत्री मुकुल संगमा पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. सुमारे आठ वर्षे राज्याचे मुख्यमंत्री राहिलेल्या संगमा यांच्या राजकीय वाटचालीत पुन्हा एकदा मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे.
राजकारणातील संगमा यांची एन्ट्री १९९३ मध्ये झाली होती. पेशाने डॉक्टर असलेल्या संगमा यांनी त्यासाठी सरकारी नोकरीचा राजीनामा दिला होता. काही कालावधीने त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
राजकीय कारकीर्द काँग्रेसमधून सुरू केलेले संगमा हे २०१० ते २०१८ या कालावधीत राज्याचे मुख्यमंत्री होते. मात्र २०१८ च्या निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव झाल्यानंतर ते विरोधी पक्षनेते बनले.
संगमा यांनी २०२१ मध्ये काँग्रेसच्या इतर ११ आमदारांसह पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर त्यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. काँग्रेससाठी हा सर्वात मोठा धक्का होता.
काँग्रेसनंतर आता संगमा हे तृणमूल काँग्रेसलाही राज्यात खिंडार पाडणार असल्याची चर्चा आहे. ते सध्या राज्याच्या विधानसभेत विरोधी पक्षनेते आहेत.
तृणमूलचे राज्यात पाच आमदार असून त्यापैकी संगमा यांच्यासह सर्व आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा राज्याच्या राजकारणात रंगली आहे.
काही दिवसांपूर्वी आमदारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली होती. त्यानंतरच या चर्चांना सुरूवात झाली होती. राज्यात २०२८ मध्ये विधानसभा निवडणूक आहे. त्याआधी काही महिने हा पक्षप्रवेश होऊ शकतो.
राज्यात भाजपचे दोन आमदार आहेत. संगमा यांच्यासह तृणमूलचे पाच आमदार भाजपसोबत गेल्यास भाजपची राज्यातील ताकद वाढणार आहे. तृणमूल शुन्यावर येणार आहे. आधी काँग्रेस अन् आता तृणमूलला झटका बसणार आहे.