Rashmi Mane
शेतकरी नेते बच्चू कडू पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. तब्बल 27 वर्षांनंतर ते पुन्हा शिवसेनेत परतले आहेत. त्यांच्या या निर्णयामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा मिळू शकते.
बच्चू कडू यांचे पूर्ण नाव ओमप्रकाश बाबाराव कडू आहे. विदर्भातील आक्रमक आणि जनतेसाठी लढणारे नेते म्हणून त्यांची ओळख आहे. विशेषतः शेतकरी आणि दिव्यांगांच्या प्रश्नांवर त्यांनी आवाज उठवला.
अमरावती जिल्ह्यातील बेलोरा गावात शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच संघर्ष आणि कष्ट यांची सवय असल्याने त्यांनी सामान्य माणसाच्या समस्या जवळून अनुभवल्या.
बच्चू कडू यांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात शिवसेनेतून केली होती. सामाजिक प्रश्नांवर लढा देत त्यांनी लवकरच आपली वेगळी ओळख निर्माण केली.
1999 मध्ये त्यांनी ‘प्रहार जनशक्ती पक्ष’ स्थापन केली. विदर्भात या पक्षाने मजबूत पकड निर्माण केली आणि कडू यांनी स्वतंत्र राजकीय शक्ती म्हणून स्थान मिळवले.
2004 मध्ये अचलपूर मतदारसंघातून त्यांनी पहिली निवडणूक लढवली आणि विजय मिळवला. ते सलग चार वेळा आमदार राहिले, मात्र 2024 मध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
आता बच्चू कडू पुन्हा शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. विधानपरिषदेसाठी त्यांना शिंदेच्या शिवसेनेकडून उमेदवारी दिली जाणार आहे. त्यामुळे त्यांच्या पुढील राजकीय भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.