Deepak Kulkarni
राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष पेटला आहे.
मंत्री छगन भुजबळांना चोहोबाजूने घेरलं.. त्याचवेळी एक नेता सर्वप्रथम भुजबळांची ढाल झाला.
प्रकाश शेंडगे असं या नेत्याचं नाव.. एक भुजबळ पाडला तर १६० मराठा नेते पाडू, असा इशारा देऊन प्रकाश शेंडगे भुजबळांच्या समर्थनार्थ उतरले.
राज्यभरात लाखोंचे ओबीसी मेळावे भरत असताना प्रकाश शेंडगे झंझावती भाषणं करून ओबीसींची भूमिका मांडताना दिसतात.
प्रकाश शेंडगे हे माजी मंत्री शिवाजीराव शेंडगे यांचे पुत्र.सांगली जिल्ह्यातील केरेवाडीचे हे शेंडगे कुटुंब शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ होते.
त्यामुळे राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर हे कुटुंब काँग्रेसमधून राष्ट्रवादीत आले, मात्र शिवाजीराव शेंडगे यांच्या पश्चात प्रकाश शेंडगे यांनी भाजपात प्रवेश केला.
त्यांना भाजपने लगेचच विधान परिषद सदस्य केले. पुढे 2009 मध्ये सांगली जिल्ह्यातील जत मतदारसंघातून ते भाजपचे आमदार झाले.
2014 च्या विधानसभेला त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून आमदारकी लढवली, मात्र त्यांचा पराभव झाला. 2019 च्या लोकसभा निवडणुकीअगोदर त्यांनी राष्ट्रवादी सोडली.
राष्ट्रवादी सोडल्यानंतर ते ओबीसी व्हीजेएनटी संघर्ष समितीच्या माध्यमातून काम करू लागले. लोकसभेला त्यांनी प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीचा प्रचार केला. 2019 च्या विधानसभा निवडणुकीवेळी ते शिवसेनेसोबत गेले.