सरकारनामा ब्यूरो
औरंगजेबाच्या कबरीवरून महाराष्ट्रातील राजकारण प्रचंड तापलेले आहे. तात्काळ ही कबर हटवून त्या जागी मराठ्यांच्या शौर्याचे प्रतिक असलेले स्मारक उभारण्याची मागणी केली जात आहे.
औरंगजेबाची कबर असलेली जागा कोणाची आहे यावरूनही वादाला फाटे फुटत आहेत. अशातचं औरंगजेबाचे वंशज असल्याचं सांगत एक व्यक्तीने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहिले आहे.
प्रिन्स याकूब हबीबुद्दीन टुसी असे या व्यक्तीचे नाव असून ते स्वत:ला शेवटचे मुघल बादशहा शाह जाफर यांच्या सहाव्या पिढीतील असल्याचे म्हणत आहे.
त्यांनी यापूर्वीही ताजमहाल, बाबरी मस्जिदवर दावा केला होता. अशा विधानांमुळे आणि दाव्यांमुळे ते सतत चर्चेत असतात.
त्यांच्या या दाव्यांवर जरी कोणी विश्वास ठेवत नसेल तरीही त्यांचे राहणीमान, वागणूक एका राजासाऱख्या आहे. शाही शेरवानी अशा पेहरावामध्ये ते सतत असतात.
मुघलांचा वंशज असल्याचा दावा करणारे याकूब यांनी हिंदुस्थानच्या रॉयल मुघल कुटुंबाच्या नावाने एक लेटर हेड आणि मोहोरही बनवली आहे.
या माध्यमातून ते राष्ट्रपती, पंतप्रधान, सरकार आणि प्रशासनातील इतर लोकांबरोबर पत्रव्यवहार करतात.
त्यांनी रॉयल मुघल कुटुंबाच्या नावाने एका ट्रस्टची स्थापन केली आहे. यावरुन वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन ते मुघलाचे वंशज असल्याचा दावा करतात.