Deepak Kulkarni
विवाह किंवा लग्न हा प्रत्येक तरुण किंवा तरुणीच्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट असतो. आपल्याला योग्य जोडीदार मिळावा ही अपेक्षा असते. त्यात पोलिस सेवेत असलेला अधिकारी जावई मिळवण्यासाठी मुलीचं कुटुंब धडपडत असते.
याचदरम्यान, बीडमधून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. पीएसआय जावई मिळाल्यामुळे प्रचंड आनंदी असलेल्या आणि मुलीच्या सुखासाठी जेवढं चांगलं लग्न करता येईल तेवढं उत्तम लग्न पार पडण्यासाठी झटणार्या कुटुंबावर मोठा प्रसंग ओढावला.
एकीकडे मुलीच्या घरी लग्नाची लगबग सुरू असतानाच पीएसआय नवरदेव पवन निंबाळकर यानं अचानक लग्नाला नकार दिला. यामुळे नवरी मुलीच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला.
आपल्या लाडक्या मुलीच्या आनंदाच्या सर्वोत्तम क्षणासाठी कोणतीही कमतरता न ठेवता तिच्या आई-वडिलांनी कपडे,दागिने, साखरपुडा अन् आता काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या लग्नाच्या तयारीवर आयुष्यभर पै पै करुन जमवलेली कमाई खर्च केली.
पण अचानक लग्नाला नकार दिलेल्या पीएसआय जावयाची समजून सांगण्यासाठी गेलेल्या मुलीच्या कुटुंबाकडे या नवरा मुलगा व त्याच्या कुटुंबानं धक्कादायक मागणी केली.
तुम्हांला हे ठरलेलं लग्न करायचं असेल तर 20 तोळं सोनं, दहा लाख हुंडा अशा डोळे फिरवणाऱ्या मागण्या पीएसआय आणि त्याच्या कुटुंबीयांकडून करण्यात आल्या.
कायद्याचा रक्षक म्हणून मिरवणाऱ्या पीएसआय पवन निंबाळकर आणि त्याच्या कुटुंबावर आता नवरी मुलीच्या कुटुंबाकडून फसवणुकीसह बदनामीचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणात आता पोलिसांची एन्ट्री झाली आहे. पीएसआय असलेल्या पवन निंबाळकर व त्याच्या कुटुंबाविरोधात मुलीकडच्या लोकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांत दाखल तक्रारीत पीएसआय पवन निंबाळकरने लग्नाचं आमिष दाखवून तरुणीसह तिच्या कुटुंबाला लाखों रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.
चकलांबा पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास केला जात आहे. लग्नाच्या काही दिवस आधीच ते मोडल्यानं नवरी मुलीसह संपूर्ण कुटुंब शॉकमध्ये आहे. तर दुसरीकडे निंबाळकर कुटुंबावर कारवाईची टांगती तलवार आहे.