Hrishikesh Nalagune
15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संपूर्ण देशात आनंदाचे वातावरण होते.
पुण्यातही रात्री 12 वाजता चौघडे झडले. सरकारी अधिकृत कार्यक्रम आणि लोकांचे सार्वजनिक कार्यक्रम यात चढाओढ लागली होती.
रात्री १२ वाजता कलेक्टर कचेरीवर कलेक्टरांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकविण्यात आला.
त्याचवेळी शनिवारवाड्यासमोर क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या हस्ते राष्ट्रध्वज डौलाने फडकला.
काँग्रेस भवनावर, लोकल बोर्ड, नगरपालिका, फुले मार्केट याठिकाणी रात्री बारा वाजता राष्ट्रीय निशाण फडकविण्यात आले.
पोलीसांची मिरवणूक, सायकल मिरवणूक, विजेच्या रोषणाईने सुशोभित मोटारीची मिरवणूक पार पडली.
त्या मिरवणुकीतून होणाऱ्या घोषणांनी 'हिंदुस्थान स्वतंत्र झाला, "निद्रितावस्थेतून तो जागृतावस्थेत प्रवेश करीत आहे,' अशी लोकांना जाणीव करून दिली गेली.
लक्ष्मी रोड, शिवाजी रोड, स्टेशन रोड हे शहरांतील प्रमुख रस्ते ठिकठिकाणी कमानी उभारून व पताका लावून सुभोषित करण्यात आले होते.
स्वातंत्र्योत्सवाच्या आनंदात परिटांनी फुकट इस्त्री, फोटोग्राफर्सनी फुकट फोटो, गिरणीत फुकट दळण, हॉटेलवाल्यांनी फुकट चहा वाटला होता.
सिनेमागृहात प्रेक्षकांना पेढे व नारळ वाटण्यात आले. शाळांमध्ये मुलांची कवायत घेऊन त्यांना खाऊ वाटप करण्यात आले.
India Independence Day Special: ब्रिटीश सरकारनं भारतीय स्वातंत्र्यासाठी 15 ऑगस्ट हीच तारीख का निवडली?