Rajanand More
पंजाबमधील प्रसिध्द अभिनेत्री म्हणून सोनिया मान यांची ओळख आहे. प्रामुख्याने युवकांमध्ये त्यांची चांगलीच क्रेझ आहे.
सोनिया यांनी रविवारी (ता. 23) राजकारणात एन्ट्री केली. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीत त्यांनी आम आदमी पक्षात प्रवेश केला.
पंजाबमधील निवडणुकीत सोनिया यांनी आपचा उघडपणे प्रचार केला होता. मात्र, त्यांचा अधिकृत प्रवेश झाला नव्हता.
पंजाबमधील शेतकरी नेते बलदेव सिंह यांच्या सोनिया या कन्या आहेत. त्यामुळे सामाजिक शेतकरी संघटनेसह इतर सामाजिक कामांमध्येही त्या काही प्रमाणात सक्रीय होत्या.
शेतकरी आंदोलनातही त्यांचा सहभाग होता. ऑल इंडिया जाट महासभेशी त्यांचा संबंध होता. त्यांना महिला युवा मोर्चाचे अध्यक्षपद देण्यात आले होते.
नुकताच त्यांनी युवा मोर्चा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. पंजाब सीमेवर शेतकऱ्यांवर होत असलेल्या अत्याचाराचे कारण त्यासाठी सांगितले जात होते. त्यानंतर त्यांच्या आप प्रवेशाच्या चर्चा सुरू झाल्या होत्या.
सोनिया यांच्या आप प्रवेशामुळे पक्षाला आगामी विधानसभा निवडणुकीत फायदा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे युवक तसेच चित्रपटसृष्टीतून आपला पाठिंबा मिळवण्यात सोनिया यांचा मोठा सहभाग असेल, अशी चर्चा आहे.
सोनिया या पंजाब चित्रपटसृष्टीत प्रसिध्द असल्या तरी त्यांनी तेलुगु, हिंदी आणि मल्ल्याळम चित्रपटांमध्येही काम केले आहे.
मल्याळम चित्रपट ‘टीन्स’ मधून सोनिया यांनी 2013 मध्ये आपल्या करिअरला सुरूवात केली. त्यानंतर त्याचवर्षी पहिला पंजाबी चित्रपट ‘हाणी’ रिलीज झाला.