Roshan More
राम मंदिर ट्रस्टमध्ये हजारो कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या कथित आर्थिक गैरव्यवहाराबाबत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी थेट पंतप्रधान मोदींना पत्र लिहिले आहे.
पत्रात म्हटले आहे की, या कथित गैरव्यवहारामुळे प्रत्येक सामान्य भाविकाची मोठी फसवणूक झाल्याची भावना निर्माण झाली आहे.
एवढे गंभीर आणि संवेदनशील आरोप होऊनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अद्याप कोणतीही भूमिका घेतले नसल्याचा उल्लेख राहुल यांनी केला आहे. तसेच प्रधानांचे असे मौन बाळगणे अत्यंत संशयास्पद आणि अस्वीकारार्ह आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
या ट्रस्टवरील सर्व सदस्य पूर्णपणे केंद्र सरकारनेच नियुक्त केले असून ते आरएसएस आणि व्हीएचपीशी जोडलेले आहेत, असा दावा त्यांनी केला.
ट्रस्टचे सर्व आर्थिक व्यवहार, रोख रक्कम, सोने आणि चांदीच्या व्यवस्थापनाची तात्काळ चौकशी व्हावी. या संपूर्ण घोटाळ्याची स्वतंत्र आणि सर्वंकष चौकशी करण्याचे आदेश पंतप्रधानांनी द्यावेत, अशी मागणी केली.
चौकशीचा अहवाल आणि ट्रस्टची सर्व आर्थिक खाती देशातील जनतेसाठी खुली करण्यात यावीत.हिशोब सार्वजनिक केल्यामुळे प्रत्येक भाविकाला आपल्या देणगीचा नेमका वापर कसा झाला हे समजू शकेल, असे देखील त्यांनी म्हटले आहे.
या मोठ्या आर्थिक गैरव्यवहारामध्ये जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई व्हावी.दोषी व्यक्तीचे पद किंवा राजकीय प्रभाव कितीही मोठा असला तरी त्याला सोडले जाऊ नये.