Deepak Kulkarni
राज्यातील शाळा सोमवारी(ता.15 जून) सुरू झाल्या. मात्र, रायगड जिल्ह्यातील वहाळमधील पीएमश्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम एकदमच लक्षणीय ठरला.
विशेष म्हणजे या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते.
शाळेतील इयत्ता चौथीच्या एका चिमुरड्या विद्यार्थिनीनं थेट मुख्यमंत्र्यांची घेतलेली मुलाखत या कार्यक्रमाचं सर्वात मोठं आकर्षण ठरलं.
या शालेय विद्यार्थिनीनं मुख्यमंत्र्यांना अत्यंत आत्मविश्वासानं प्रश्न विचारले. या मुलाखतीत शिक्षण, सामाजिक कार्य आणि डिजिटल युगातील बदल याविषयी विविध प्रश्नांचा समावेश होता. फडणवीसांनी तिच्या सर्व प्रश्नांची अत्यंत मनमोकळेपणे आणि कौतुकानं उत्तरं दिली.
शाळा प्रवेशोत्सवाच्या निमित्ताने नव्याने शाळेत दाखल झालेल्या इयत्ता पहिलीच्या लहान मुलांचे औक्षण करून आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांना गुलाबपुष्प देऊन अत्यंत उत्साहात स्वागत केले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी वर्गखोलीत जाऊन विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घेतली आणि त्यांच्याशी संवाद साधला.
मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना या आधुनिक डिजिटल लॅबचा दररोज नियमित वापर करून आपले ज्ञान, कौशल्य आणि आत्मविश्वास वाढवण्याचा मोलाचा संदेश दिला.
राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी थेट संवाद साधता आल्यामुळे आणि आपल्याच वर्गातील मैत्रिणीनं त्यांची घेतलेली मुलाखत पाहून वहाळ जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झालं होतं.