Rajanand More
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या १९ व्या वर्धापनदिनानिमित्त अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी (ता. ९ मार्च) महाराष्ट्र सैनिकांशी संवाद साधला. या भाषणातील ठळक मुद्दे...
मी केवळ शुभेच्छा, बाकी जो दांडपट्टा फिरवायचा आहे तो आपल्या गुढीपाडव्याच्या मेळाव्यात फिरवणार, असे म्हणत त्यांनी भाषणाला सुरूवात केली.
महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे. त्यात फक्त मतं, त्यातून सत्ता मिळवणे आणि ही दोन्ही मिळवण्यासाठी तुमची आपापसात भांडणं लागली पाहिजेत, यासाठीच सगळं सुरु आहे, अशी टीका राज यांनी केली.
महिला दिनाबाबत बोलताना राज ठाकरेंनी हा दिवस जिजाऊ साहेबांच्या नावाने ओळखला गेला पाहिजे, असे म्हटले. स्वराज्यामागे एका स्त्रीची प्रेरणा होती, हे आपण विसरतो, असेही ते म्हणाले.
पक्षाला 19 वर्ष पूर्ण. पक्षाने जय पाहिला पराजय पाहिला पण तरी या पक्षातील माणसं एकत्र कशी राहतात?, असे प्रश्न अनेकांना पडतो. याला दृष्ट लागू नये, अशी अपेक्षा ठाकरेंनी व्यक्त केली.
सध्या जे राजकीय फेरीवाले आलेत की जे आज या फुटपाथवर, कोणी डोळे मारले की त्या फुटपाथवर. असले फेरीवाले मला पक्षात नको आहेत, असे राज ठाकरेंनी स्पष्ट केले.
पुढच्या 2 दिवसांत पक्षातील नेत्यांपासून ते गटाध्यक्षांपर्यंत प्रत्येकाची कामं, त्याची आचारसंहिता हे घेऊन येत आहे. माझी आचारसंहिता पण त्यात असणार आहे, असे राज यांनी स्पष्ट केले.
दर 15 दिवसाला प्रत्येकाचं काम तपासलं जाणार आहे आणि त्याची यंत्रणा पण लावली आहे. आणि कोणी कामचुकारपणा करत असेल तर त्याला पदावर ठेवणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
पुढच्या काही दिवसांत प्रत्येकाला त्याच्या जबाबदाऱ्या दिल्या जातील, त्याचं नीट पालन झालंच पाहिजे, असेही राज यांनी स्पष्ट केले.
आमचे बाळा नांदगावकर कमंडलूमधून गंगेचं पाणी घेऊन आले. इतक्या लोकांनी अंघोळ केल्यावर गंगा कशी स्वच्छ राहील. असलं पाणी कोण पिणार?, असे विधान राज ठाकरेंनी केले आहे.
श्रद्धा समजू शकतो पण या देशातील एक नदी स्वच्छ नाही, नदीला आपण माता म्हणतो पण त्या नदीला आपण स्वच्छ ठेवत नाही. अंधश्रद्धेतून माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी बाहेर यावं, असे आवाहन त्यांनी केले.