Deepak Kulkarni
दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळ्यात 'मुंबईची झाली तुंबई' ही हेडलाईन पाहायला मिळाली. त्याचं कारण म्हणजे मुसळधार पावसामुळे मुंबईसह उपनगरांत जागोजागी झाडं कोसळली, पाणी साचलं,मेनहोलमध्ये माणूस पडण्यासह अनेक दुर्घटना घडल्या.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एका कार्यक्रमात मुंबईतील जोरदार पावसामुळे कोलमडलेलं जनजीवन, दुर्घटना, लोकल रेल्वेचा उडालेला बोजवारा, मिसिंग लिंक यांसह अनेक मुद्द्यांवरुन सरकारला धारेवर धरलं.
राज ठाकरेंनी त्यांच्या भाषणात, "पावसावर गाणं तयार करणारी ती बाई आरजे मलिष्का आता कुठे गेली?" असा सवाल उपस्थित केला होता.
राज ठाकरेंनी उल्लेख करताच आरजे मलिष्का पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. तिचा नवा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
आरजे मलिष्कानं पुन्हा एकदा बीएमसीला टार्गेट करताना मुंबईतील मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर नवी उपरोधिक अन् व्यवस्थेच्या डोळ्यात अंजन घालणारी नवी कविता सादर केली आहे.
विशेष म्हणजे ही आरजे मलिष्काची नवी कविता व्हायरल होत असताना याचं श्रेय 'नेटकरी' यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना देताना पाहायला मिळत आहेत.
आरजे मलिष्काला एका रात्रीत फेमस केलेल्या 2017 मधील तिच्या "मुंबई, तुला BMC वर भरोसा नाय काय?" या गाण्याला अजूनही लोक विसरलेली नाहीत.
या गाण्यातून तिनं मुंबई शहरातील खड्डे, साचणारं पाणी,लोकल रेल्वेचा उडालेला बोजवारा, वाहतूक कोंडी यांसह पावसाळ्यातील इतरही गंभीर मुद्द्यांवर बीएमसीला टार्गेट करत जोरदार व्यवस्थेला चिमटे काढले होते. हे गाणं त्यावेळी तुफान गाजलं होतं.
मात्र, या गाण्यावरुन मुंबईचं राजकारण प्रचंड तापलं होतं. कारण मुंबई महानगरपालिकेत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची सत्ता होती. त्यामुळे राजकीय वर्तुळात या गाण्याला भाजपशी जोडण्याचाही प्रयत्न करण्यात आला होता.