Pradeep Pendhare
गेली आठ शतकं विठ्ठलाच्या ओढीने पंढरपुरला लाखो भक्त न चुकता प्रस्थान करतात. माझ्या मते जगातील, अशी एकमेव आणि इतकी दीर्घ परंपरा असेल.
विठ्ठलाच्या ओढीने दरवर्षी, नेमाने, पायी, शेकडो मैल प्रवास करावयाचा, उन्हात, पावसापाण्यात, पडतील त्या हालअपेष्टा सोसत. वारकरी आपल्या गावातील दिंडीसोबत निघतात.
संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि अनेक संतांचा सहवास आहे, ही श्रद्धा मनात असते. वर्षभर घडणार आहे, ती विठ्ठलाची इच्छा आहे, असं मानण्याची आणि स्वीकारण्याची शक्ती घेऊन परत यायचं.
देवालाच भक्त भेटीची ओढ असणारा हा देव, असल्यामुळे गेली अनेक शतके महाराष्ट्रातील तळागाळातील आणि सर्व जातीतील लोकांना आपलासा वाटतो.
पंढरपुरात विठ्ठलाच्या पायाशी आल्यावर जिथे माणसाचं मी, पण गळून पडते तिथे जातीचं भान, तरी काय आणि कसं टिकणार.
महाराष्ट्रावर विठ्ठलाची कृपा आहे. दुर्दैवाने गेलं एक ते दीड दशक महाराष्ट्रात जातीपातीचे विष खोलवर रुजत आहे. याची भीती वाटते.
स्वातंत्र्यानंतर ‘महा’राष्ट्र उभं करण्याच्या जिद्दीने उभा राहिलेला समाज, अचानक सत्ता आणि पैसा हेच स्वप्न उराशी बळगणाऱ्या मूठभरांच्या नादी लागून इतका विस्कटत आहे.
विठ्ठलाच्या चरणी माझी हात जोडून प्रार्थना आहे, महाराष्ट्रात पसरत चाललेलं हे जातीपातीचे विष समूळ नष्ट कर. आणि पुन्हा एकदा हिमालयाच्या रक्षणाला धावणारा एकसंध सह्याद्री दिसू दे.