Ganesh Sonawane
राजाभाऊ वाजे हे शिवसेना उद्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत.
ऑपरेशन टायगर'च्या पार्श्वभूमीवर ते देशभरात चर्चेत आले आहेत. उद्धव ठाकरेंसोबत त्यांनी आपली निष्ठा जपली आहे.
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात वाजे कुटुंब हे बडे प्रस्थ मानले जाते. डुबेरे हे त्यांचे मूळ गाव.
राजाभाऊ यांचे आजोबा शंकरराव वाजे हे सिन्नरचे आमदार होऊन गेले. त्यांच्या आजी मथुराबाई वाजे या पहिल्या महिला नगराध्यक्षा ठरल्या.
राजाभाऊ वाजे यांचे चुलत आजोबा विठ्ठल बाळाजी वाजे हे सिन्नरचे माजी नगराध्यक्ष होते. चुलत आजी रुक्मिणी बाई वाजे यादेखील माजी आमदार राहिल्या आहेत.
वडील प्रकाश वाजे हे देखील राजकारणात होते. कौटुंबिक राजकीय वारसा असूनही राजाभाऊ अनेक वर्षे सक्रिय राजकारणापासून दूर राहिले.
2009 च्या विधानसभा निवडणुकीत वडिलांचा पराभव झाल्यामुळे राजाभाऊ वाजे राजकारणात आल्याचे सांगितले जाते. त्यापूर्वी ते सिन्नर तालुका जनसेवा मंडळाच्या माध्यमातून सामाजिक कार्य करत आले. माणिकराव कोकाटेंनी प्रकाश वाजेंचा पराभव केला होता.
2014 ला राजाभाऊ वाजेंची राजकारणात खरी एण्ट्री झाली कारण 2014 मध्ये त्यांनी पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक लढवली. माणिकराव कोकाटेंचा पराभव करुन ते सिन्नरचे आमदार झाले.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत आमदार माणिकराव कोकाटे यांच्याकडून त्यांना पराभव पत्कारावा लागला.
त्यानंतर 2024 मध्ये नाशिक लोकसभेची निवडणूक लढवली. महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांचा पराभव करुन वाजे खासदार झाले.
राजाभाऊ हे वाणिज्य शाखेचे पदवीधर आहेत. पुण्यातील शिवाजी सैनिक शाळेत त्यांचे इंग्रजी माध्यमातून शिक्षण झालेले आहे.