Rajanand More
महाराष्ट्र सरकारने 1972च्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आणलेल्या रोजगार हमी योजनेचे अमाप कौतुक होते. याच योजनेतून भारत सरकारची महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना आकारास आली.
महाराष्ट्र सरकारची रोजगार हमी योजना हीच मुळी राजर्षी शाहू महाराज यांनी 1896-97 आणि 1899-1900 मधील दुष्काळात आपल्या संस्थानामध्ये राबवलेल्या उपाययोजनांवर आधारलेली आहे.
दुष्काळात त्यांनी स्वतंत्र दुष्काळ निवारण खाते निर्माण करून त्यावर भास्करराव जाधव यांच्यासारख्या कर्तबगार अधिकाऱ्याची नियुक्ती केली होती. तालुक्याच्या ठिकाणी दुष्काळ निवारण कार्यालये स्थापन केली होती.
मुंबई परिसरात दुष्काळामुळे हजारो लोक तडफडून मरत असताना कोल्हापूर संस्थानात एकही भूकबळी पडला नव्हता.
शाहू महाराज यांनी दुष्काळात दिव्यांग, वृद्ध आणि निराधार लोकांसाठी कटफळ, पन्हाळा, बांबवडा बाजार, भोगाव, गारगोटी, वळीवडे, चिरवडा, गडहिंग्लज, कोल्हापूर, वडगाव व शिरोळ असे नऊ आश्रम काढले होते.
आश्रमामध्ये 50 हजारांवर लोकांची सोय करून त्यांचे जीव वाचवले. म्हैसूर राज्यातून धान्य मागवून गावागावांमध्ये धान्याची दुकाने काढली. धान्य घेण्यासाठी लोकांच्या हाती पैसे यावे म्हणून रस्त्यांची, विहिरींची, तलावांची कामे काढली.
मजुरीवर काम करणाऱ्या महिलांच्या तान्ह्या मुलांसाठी कामाच्या ठिकाणी पाळणाघरे उभी केली. म्हातारे, आंधळे, पांगळे, दीनदुबळ्यांसाठी शिधावाटप केंद्रे त्यांनी सुरू केली.
दुष्काळी कामे सुरू असताना 'काम तसे दाम' हे धोरण शाहू महाराजांनी अवलंबले. जो जितके काम करेल त्याला तितके दाम मिळेल. कामगारांच्या गटाने जितके काम केले असेल, त्या प्रमाणात त्यांना वेतन देण्यास सुरुवात केली.