Deepak Kulkarni
मुंबईतील जुहू परिसरात १८ ऑक्टोबर २०२६ रोजी बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ यांच्या कारवर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली होती.
त्यानंतर मुंबई पोलिसांनी गोळीबार प्रकरणातील आरोपींना पकडण्यासाठी तेजस्विनी गौतम यांच्याशी फोनवरुन संपर्क साधला. यानंतर त्यांच्या नेतृत्वाखाली कोटा पोलिसांनी अतिशय वेगवान कारवाई केली.
या कारवाईदरम्यान, पोलिसांनी तत्परता, गुप्तता आणि दक्षतेसह कारवाई करत तीनही आरोपींना बेड्या ठोकल्या होत्या. हे आरोपी पळून जाण्याच्या तयारीत होते. या धडाकेबाज मोहिमेचं सोशल मीडियावर प्रचंड कौतुक केलं जात आहे.
राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी स्वतः या कारवाईची दखल घेतली. त्यांनी या यशस्वी आणि आव्हानात्मक कारवाईचं कौतुक केलं.
राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांनी कोटाच्या पोलीस अधीक्षक तेजस्विनी गौतम यांना फोन करून त्यांच्यासह संपूर्ण टीमचं अभिनंदन केलं.
तेजस्विनी गौतम या मूळच्या दिल्लीतील असून त्यांनी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करत भारतीय पोलीस सेवेत प्रवेश केला. त्यांचे शिक्षण राजकारणशास्त्र, कायदा, सार्वजनिक प्रशासन आणि पोलीस व्यवस्थापन या विषयांशी संबंधित आहे
त्या 2013 बॅचच्या राजस्थान केडरच्या अधिकारी आहेत.
त्यांनी आत्तापर्यंत जयपूरमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जयपूर पोलीस आयुक्तालयात उपायुक्त, बांसवाडा, चुरू, अलवर आणि बिकानेर येथे पोलीस अधीक्षक आणि जयपूर शहराच्या पूर्व विभागात DCP म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.
टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणातील तीन संशयितांना १९ ऑक्टोबर रोजी कोटा रेल्वे स्थानकावर अवघ्या १५ ते २० मिनिटांच्या कारवाईत ताब्यात घेतलं. या सर्व आरोपींना नंतर पुढील तपासासाठी मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.