Rajanand More
दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना सध्या 'छावा' चित्रपटामुळे प्रसिध्दीच्या झोतात आहे. या चित्रपटात तिने संभाजी महाराजांच्या पत्नी येसूबाई यांची भूमिका केली आहे.
काँग्रेसचे कर्नाटकातील आमदार रवी गौडा यांनी काही दिवसांपूर्वी रश्मिकाला आयुष्यभराचा धडा शिकवण्याची धमकी दिली आहे. राज्यातील चित्रपट महोत्सवाला येण्यास नकार दिल्याने धमकी दिल्याचे सांगितले जात आहे.
रश्मिका ही मुळची कर्नाटकची आहे. पण त्यानंतरही ती आली नाही. आपण हैद्राबादचे असल्याचे ती म्हणते. कर्नाटक कुठे आहे, असेही ती म्हणाल्याचा दावा गौडा यांनी केला होता.आता
गौडा यांच्या धमकीनंतर कर्नाटकातील राजकारण तापले आहे. भाजपकडून काँग्रेस सरकारवर जोरदार निशाणा साधला जात आहे.
आपण रश्मिकाचे चित्रपट पाहतो. पण माझ्या भूमिकेवर ठाम आहे. ती कर्नाटकची असून चित्रपटाची सुरूवातही इथूनच केली. आपले राज्य, आपली माती, आपल्या भाषेचा सन्मान करायलाच हवा, असे गौडा म्हणाले आहेत.
गौडा यांनी वाद निर्माण झाल्यानंतर खुलासा करण्याचा प्रयत्न केला. धडा शिकवणार असे मी म्हणालो म्हणजे त्यांच्यावर हल्ला करण्याचा माझा हेतू नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी केले आहे.
कोडावा नॅशनल कौन्सिलने रश्मिकाच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे. तसेच तिला सुरक्षा पुरवण्याची मागणी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह कर्नाटक सरकारकडे केली आहे.
रश्मिकाने मेहनतीने चित्रपटसृष्टीत नाव कमावले आहे. ती विचार करण्यास स्वतंत्र असून कुणीही जबरदस्ती करू शकत नाही. त्यामुळे तिला सुरक्षा पुरवावी, अशी मागणी कौन्सिलने पत्रातून केली आहे.