Deepak Kulkarni
प्रसिध्द आध्यात्मिक गुरू भैय्यूजी महाराज या नावाभोवती एकेकाळी प्रचंड मोठं ग्लॅमर होतं. राजकारण, चित्रपटसृष्टी तसेच उद्योगजगतातील अनेक बड्या हस्तीही त्यांच्यासमोर नतमस्तक झालेल्या दिसून आल्या होत्या.
इंदूरमध्ये असलेल्या भैय्यूजी महाराजांच्या आश्रमात धनंजय मुंडेंची भेट, त्यानंतर मैत्री, मैत्रीचं रुपांतर प्रेमात आणि मग मंदिरात लग्न असा सगळा घटनाक्रमही करुणा मुंडे यांनी यापूर्वी सांगितला होता.
आमदार रत्नाकर गुट्टे यांनी धनंजय मुंडेंना इशारा देतानाच, 'धनुभाऊ, तुमचा इंदूरमध्ये मर्डर झाला असता. पण भैय्यूजी महाराजांनी तुम्हाला वाचवलं. तुम्ही कोणत्या हॉटेलवर होतात हे देखील आम्हाला माहिती आहे, पण आताच सगळं काढणार नाही', असं म्हटलं होतं.
भैय्यूजी महाराज यांनी आध्यात्मिक गुरू म्हणून मोठी प्रसिध्दी मिळवली होती.सर्वच राजकीय नेत्यांशी त्यांचा चांगलाच सलोखा होता. चित्रपटक्षेत्रातील अनेक सितारे उद्योगक्षेत्रामधील त्यांच्या आश्रमात कायमच राबता होता. ही मंडळी महाराजांचे दर्शन आणि मार्गदर्शनासाठी रांगा लावून असायचे.
भैय्यूजी महाराज यांचे खरे नाव उदयसिंह देशमुख असून त्यांचा जन्म मध्यप्रदेशातील शुजालपुर येथे झाला होता.लहानपणापासूनच त्यांना अध्यात्माची आवड होती. घोडस्वारी आणि तलवारबाजीतही ते पारंगत होते. काही दिवस मॉडेलिंगचे काम केल्यानंतर त्यांनी अध्यात्मिक जगतात पाऊल ठेवले.
यानंतर महाराजांनी धार्मिक ट्रस्ट चालवण्याचा निर्णय घेतला. त्यांचा भक्तपरिवार वाढत गेला तसा मध्यप्रदेशासह महाराष्ट्रातला त्यांचा वावर वाढत गेला. त्यांच्या संस्थांनी धार्मिकसह सामाजिक जीवनात अनेक महत्त्वपूर्ण काम केलं आहे. विशेष म्हणजे त्यांनी मध्यप्रदेश सरकारने दिलेला राज्यमंत्रीपदाचा दर्जाही नाकारला होता.
पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर भैय्यूजी महाराजांनी डॉ.आयुषी शर्मा यांच्याशी त्यांनी दुसरा विवाह केला. पण त्यानंतर त्यांच्या आयुष्यात वादाला सुरुवात झाल्याचे बोलले जाते.
राष्ट्रसंताचा दर्जा प्राप्त झालेले आधात्मिक गुरु भैय्यूजी महाराजांनी 12 जून 2018 रोजी मध्यप्रदेशातील इंदूर येथील त्यांच्या राहत्या घरी स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केली होती.
भैय्यूजी महाराजांच्या आत्महत्येनं राजकीय विश्व, चित्रपटसृष्टी, उद्योगजगतासह त्यांच्या भक्त परिवारालाही मोठा धक्का बसला होता. प्रसिध्दीचं प्रचंड मोठं वलय लाभलेले राष्ट्रसंत महाराजांच्या सुसाईड नोटमध्ये त्यांच्या संपूर्ण संपत्तीचे अधिकार त्यांच्या पत्नी किंवा मुलीच्या हाती न देता त्यांचे सेवादार विनायक यांच्याकडे देण्याबाबत उल्लेख आढळून आला होता.