Rashmi Mane
क्रेडिट कार्डच्या साहाय्याने घरभाडे भरणाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) नव्या नियमांची अंमलबजावणी केली असून आता क्रेडिट कार्डद्वारे फक्त नोंदणीकृत व्यापाऱ्यांनाच पेमेंट करता येणार आहे
त्यामुळे PhonePe, Paytm, Cred सारख्या फिनटेक अॅप्सनी क्रेडिट कार्डद्वारे रेंट पेमेंटची सुविधा बंद केली आहे.
आतापर्यंत मोठ्या प्रमाणावर भाडेकरू फोनपे, पेटीएमसारख्या अॅप्सचा वापर करून घरभाडे भरत होते. काहीजण मात्र या सुविधेचा गैरवापर करत होते.
स्वतःच्या किंवा ओळखीच्या लोकांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करून त्यावर कॅशबॅक आणि रिवॉर्ड पॉइंट्स मिळवत होते. RBIने अशा गैरवापराला आळा घालण्यासाठी कठोर पाऊल उचलले आहे.
घरमालकाने जर क्रेडिट कार्डद्वारे भाडे स्वीकारायचे असेल, तर त्याने केवायसी पूर्ण करून स्वतःला व्यापाऱ्याच्या स्वरूपात नोंदवणे बंधनकारक असेल. केवायसीची प्रक्रिया केंद्रीय केवायसी रजिस्ट्रीद्वारे किंवा बँकेच्या तपासणीतून पूर्ण केली जाणार आहे.
या निर्णयाचा थेट फटका त्या भाडेकरूंना बसणार आहे जे क्रेडिट कार्डच्या माध्यमातून व्याजमुक्त कालावधीचा लाभ घेत भाडे भरत होते. रिवॉर्ड पॉइंट्स आणि कॅशबॅक सारखे फायदेही आता त्यांना मिळणार नाहीत. तसेच अनेकजणांना रोख रक्कम वापरल्याशिवाय भाडे भरण्याची सुविधा मिळत होती, तीही आता बंद झाली आहे.
आता भाडे भरण्यासाठी इतर पर्यायांचा वापर करावा लागणार आहे. यात UPI ट्रान्सफर, NEFT, RTGS, IMPS किंवा चेक यांचा समावेश आहे. नोंदणीकृत नसलेल्या घरमालकांसाठी क्रेडिट कार्ड पेमेंटचे दरवाजे पूर्णपणे बंद झाले आहेत.