Rashmi Mane
आज 4 ऑक्टोबर 2024 देशाचे वीर स्वातंत्र्यसैनिक श्यामजी कृष्ण वर्मा यांची जयंती प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सोशल मिडियावर पोस्ट करत श्रद्धांजलि अर्पित केली.
या पोस्टमध्ये एक अतिशय प्रेरणादायी आठवण त्यांनी सांगितली आहे. ती म्हणजे श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या शेवटची इच्छा साकार करण्याचा अनुभव.
श्यामजी कृष्ण वर्मा, जे गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील मांडवी गावात जन्मले, हे फक्त एक विद्वान आणि वकील नव्हते, तर भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामाचे साक्षीदार होते.
श्यामजी कृष्ण वर्मा यांचा मृत्यू ३० मार्च १९३० रोजी जिनेवा येथे झाला होता. त्यांच्या शेवटच्या इच्छेनुसार, भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांच्या अस्थी भारतात आणल्या जाव्यात. मात्र, देशाच्या स्वातंत्र्यापर्यंतही ही इच्छा पूर्ण झालेली नव्हती.
त्या अधुऱ्या स्वप्नाला साकार करण्याचा संकल्प नरेंद्र मोदी यांनी घेतला. तब्बल 56 वर्षांनी ऑगस्ट 2003 मध्ये गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री मोदी स्वतः श्यामजी कृष्ण वर्मा यांची अंतिम इच्छा पूर्ण करण्यासाठी ते स्वतः जिनेवाला गेले.
मोदी थेट स्वित्झर्लंडमध्ये गेले आणि 22 ऑगस्ट 2003 रोजी त्यांनी जिनेवा येथे सेंट जॉर्ज स्मशानभूमीतून अस्थी मिळवली आणि भारतात आणण्यासाठी स्विस सरकारसोबत समन्वय साधून श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या अस्थी घेऊन भारतात आले.
अस्थी आणल्यावर मोदींनी एक भव्य ‘विरांजली यात्रा’ आयोजित केली. या यात्रेत अस्थी भरलेला कलश गुजरातच्या 17 जिल्ह्यांतून जाऊन, हजारो युवकांच्या उपस्थितीत श्रद्धांजलि दिली गेली. दक्षिण गुजरात, मध्य गुजरात, सौराष्ट्र आणि कच्छ या भागातून प्रवास करत, शेवटी मांडवीतील वर्मा कुटुंबाला ही अस्थी सुपूर्द करण्यात आली.
श्यामजी कृष्ण वर्मा हे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील अग्रगण्य क्रांतिकारी होते. त्यांनी लंडनमध्ये इंडियन होम रूल सोसाइटी, इंडिया हाऊस आणि द इंडियन सोशियोलॉजिस्ट सारख्या संस्थांची स्थापना करून भारतीय तरुणांना स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होण्याची प्रेरणा दिली.