Rashmi Mane
आता सर्व काही डिजिटल झालं आहे. अगदी काही मिनिटांत आपण जगातील कोणत्याही कोपऱ्यात पैसे पाठवू शकतो. यासाठी यूपीआय (UPI) हे सर्वात सोयीचं आणि वेगवान माध्यम ठरलं आहे.
आतापर्यंत मात्र फक्त 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या आणि बँक खाते असलेल्या व्यक्तींनाच यूपीआयचा वापर करता येत होता. पण आता लहान मुलांनाही यूपीआय वापरण्याची सुविधा मिळणार आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जुनियो पेमेंट्स या फिनटेक कंपनीला प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट्स (PPI) जारी करण्याची परवानगी दिली आहे.
आता अल्पवयीन मुलांना बँक खात्याशिवाय यूपीआय वापरून पेमेंट करता येणार आहे. जुनियो लवकरच आपलं UPI लिंक्ड डिजिटल वॉलेट लाँच करणार आहे.
या नव्या वॉलेटच्या मदतीने मुले क्यूआर कोड स्कॅन करून पेमेंट करू शकतील. म्हणजेच दुकानात, कॅन्टीनमध्ये किंवा ऑनलाइन खरेदीसाठी ते सहज व्यवहार करू शकतील. हे सर्व व्यवहार पालकांच्या परवानगी आणि देखरेखीखाली होतील.
या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे मुलांमध्ये आर्थिक साक्षरता वाढवणे हा आहे. “UPI Circle” प्रकल्पांतर्गत तयार केलेल्या या व्यवस्थेत मुलांचे खाते त्यांच्या पालकांच्या खात्याशी जोडलेले असेल. त्यामुळे पालकांना आपल्या मुलाने किती आणि कुठे पैसे खर्च केले हे पाहता येईल.
जुनियो अॅप मुलांना पैशांची जबाबदारी शिकवण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. पालक या अॅपद्वारे आपल्या मुलांच्या खर्चावर मर्यादा ठरवू शकतील, तसेच व्यवहारांवर लक्ष ठेवू शकतील. त्यामुळे डिजिटल पेमेंटसोबतच मुलांना आर्थिक नियोजनाचं शिक्षण मिळेल.
आरबीआयच्या या निर्णयामुळे देशात डिजिटल व्यवहार अधिक सोपे आणि सुरक्षित होणार आहेत. लहान वयापासूनच मुलांना जबाबदार आर्थिक सवयी लावण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा टप्पा ठरेल.