Rajanand More
भारतीय रिझर्व्ह बँकेकडून बँक खातेदारांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातात. मागील काही वर्षांत सायबर गुन्हेगारीच्या माध्यमातून आर्थिक लूट वाढली आहे. यापार्श्वभूमीवरही RBI सतर्क आहे.
तुम्हाला अचानक बँकेत नोंदणीकृत असलेल्या मोबाईल मेसेज येतो, खात्यातून ठराविक रक्कम अन्य खात्यात गेली आहे. तुमच्या संमतीशिवाय किंवा तुम्ही कोणताही व्यवहार न करता झालेला हा व्यवहार म्हणजेच सायबर फ्रॉड.
वाढत्या सायबर गुन्हेगारीसमोर बँकाही हतबल आहेत. गेलेले पैसे परत मिळणार का, ही चिंता खातेदारांना असते. कारण बहुतेक डिजिटल फसवणुकीतील पैसे परत मिळत नाहीत.
आरबीआयकडून आता खातेदारांना दिलासा देणारा नियम बनविण्यात आला आहे. तुमची डिजिटल फसवणूक किंवा UPI च्या माध्यमातून आर्थिक लूट झाली असेल तर आता आरबीआयकडूनही भरपाई दिली जाणार आहे. तसे नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहे.
नवा नियम स्मॉल फायनान्स बँका, पेमेंट बँक, क्षेत्रीय ग्रामीण बँकांना सोडून सर्व कमर्शियल बँकांसाठी लागू आहेत. हे नियम १ जानेवारी २०२७ नंतर त्या तारखेपासून कोणत्याही इलेक्टॉनिक व्यवहारांसाठी लागू होतील.
संबंधित खातेदाराला 50 हजार रुपयांपर्यंतची फसवणूक झाल्यास आयुष्यभरात एकदाच अशी भरपाई दिली जाईल. ही भरपाई २५ हजार रुपये किंवा ८५ टक्के, याप्रमाणे जी रक्कम कमी असेल, त्यानुसार होईल.
ऑनलाईन फसवणूक झाल्यानंतर खातेदाराला तातडीने बँकेकडे तक्रार करावी लागेल. भरपाईची रक्कम आरबीआय आणि संबंधित बँकांकडून केली जाईल. त्यासाठी त्यांच्या वाट्याची रक्कमही निश्चित करण्यात आली आहे.
बँक किंवा यूपीआयच्या चुकीमुळे खात्यातून पैसे गेले असतील, तर संबंधितांवर खातेदारांना पूर्ण पैसे देण्याची जबाबदारी असेल, असेही आरबीआयकडून स्पष्ट करण्यात आले आहे.