सरकारनामा ब्यूरो
कामगार चळवळीचे दिवंगत नेते जॉर्ज फर्नाडीस यांची आज मंगळवार (ता.29) पुण्यतिथी आहे. या दिवसानिमित्त त्यांचे संघर्षमय आयुष्य आणि राजकीय वाटचालीबद्दल जाणून घेऊयात...
जॉर्ज फर्नाडीस यांच्या वडिलांचे स्वप्न होते की त्यांनी वकील बनावे. परंतु त्यांनी कामगार संघटनेचे नेतृत्व करण्याचा निर्णय घेतला.
जाॅर्ज यांचा जन्म मंगळूरचा. ते 1949 मध्ये मुंबईला आले तेव्हा त्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागले. राहण्यास जागा आणि खाण्यासाठी अन्न मिळवणेही खूप मोठे आव्हान होते.
त्यावेळी त्यांनी अनेकरात्र फुटपाथवर काढल्या. काही दिवस त्यांनी एका दैनिकात प्रुफरिडींगचे काम केले होते.
पुढे जाऊन ते 1950 ला राममनोहर लोहिया यांच्या संपर्कात आले. आणि त्यांच्या जीवनाची दिशा बदलली.
त्यांनी कामगारांच्या हक्कासाठी लढयचे ठरवले. आणि अशातच जॉर्ज मुंबईतील एक चर्चित कामगार नेते बनले. कामगारांच्या एकजुटीवर मुंबई बंद पाडण्याची ताकद त्यांच्या आंदोलनात होती.
1961 मध्ये त्यांनी मुंबई महापालिकेचे सदस्य म्हणून निवडणूक जिंकली. तर संयुक्त सोशालिस्ट पार्टीतून त्यांनी लोकसभेची दक्षिण मुंबई मतदारसंघातून निवडणुक लढवली.
मुंबईमधील काँग्रेसचे बलाढ्य नेते, केंद्रीय मंत्री एस के पाटील यांचा फर्नांडिसांनी यांनी 1967 च्या लोकसभा निवडणुकीत पराभव केला. मुंबईचा अनभिषिक्त राजा म्हणून परिचित असलेले असलेले एस के पाटील यांना पराभूत केल्याने फर्नांडिस यांना 'जॉर्ज द जायंट किलर' या नावाने ओळखले जाऊ लागले.
पत्रकार के. विक्रम राव आणि जॉर्ज यांना आणीबाणीच्या प्रसिद्ध डायनामाइट प्रकरणात आरोपी बनवून तिहार तुरुंगात ठेवण्यात आले होते.