Aslam Shanedivan
भारतीय महिला संघाने नुकताच आयसीसी महिला वनडे विश्वचषक जिंकून इतिहास रचला.
या विश्वविजेत्या संघातील यष्टिरक्षक ऋचा घोष हिला पश्चिम बंगाल सरकारने मानद पोलिस उप-अधीक्षक बनले आहे. तसेच तिचा ‘बंग भूषण’ या प्रतिष्ठित पुरस्कारानेही सन्मानित केले.
कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानावर बंगाल क्रिकेट असोसिएशनने ऋचासाठी एका भव्य सत्कार समारंभाचे आयोजन केले होते, ज्यामध्ये राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्वतः हजेरी लावली.
याच सोहळ्यात 22 वर्षीय ऋचाला गोल्डन बॅट, बंग भूषण पुरस्कार, एक सोन्याची साखळी (चेन) आणि डीएसपी नियुक्तीचे पत्र देण्यात आले. तसेच तिला 34 लाख रुपयांचा चेकही देण्यात आला.
द. आफ्रिकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात ऋचाने केवळ 24 चेंडूंमध्ये 34 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली होती. ज्यात तीन चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता.
विश्वचषकातील भारताच्या ऐतिहासिक विजयाच्या शिल्पकारांपैकी एक असलेल्या ऋचाने या स्पर्धेत आठ डावांमध्ये 235 धावा केल्या असून ती सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीयांमध्ये तिचा पाचवा क्रमांक आहे.
याचदरम्यान, भारताचे माजी कर्णधार आणि सध्याचे बंगाल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनीही ऋचाचे कौतुक केले असून ती एक दिवस भारतीय संघाचे कर्णधारपद भूषवेल, अशी त्यांनी आशा व्यक्त केली आहे.