Deepak Kulkarni
राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे सध्या एका मोठ्या वादात सापडले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कोकाटे यांचा विधानसभेच्या सभागृहात रमी खेळतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
या व्हिडिओमुळे राजकारण तापलं असून विरोधकांकडून कोकाटेंवर चौफेर टीका केली जात असून त्यांच्या राजीनाम्याचीही मागणी जोर धरू लागली आहे.
पण ज्या ऑनलाईन रमी गेममुळे कोकाटे अडचणीत आले आहेत. त्याच रमी गेमनं शहरात नव्हे तर ग्रामीण भागातील असंख्य तरुणांना कर्जबाजारी केल्याचं भयाण वास्तव चित्र आहे.
जय जाधव या सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात राहणाऱ्या व एका शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या तरुणाचं आयुष्य रमी खेळामुळे उध्वस्त झालंं आहे.
26 वर्षांच्या जय जाधव यानं रमीच्या गेममध्ये वाहवत जाताना सुमारे 80 लाखांचं कर्ज डोक्यावर करुन घेतलं आहे.
त्यानं दीड एकर शेतजमीन, स्कॉर्पिओ गाडी असं सारं काही रमी गेमच्या जुगारात गमावलं आहे.
जयनं त्याच्या रिअल इस्टेट व्यवसायातून कमावलेले तब्बल 23 लाख आणि मित्रांकडून घेतलेले 20 लाख असे 43 लाख रुपये रमी गेमच्या जुगारात पणाला लावले होते. अखेर तेही तो हरला.
माणिकराव कोकाटेंच्या रमी गेमच्या वादानंतर जयनं स्वतःचा अनुभव सांगत तरुणाईला मोठं आवाहन केलं आहे. 'मंत्र्याचा व्हिडिओ पाहून चुकीची प्रेरणा घेऊ नका. झालेलं नुकसान पुरे, आता थांबा',असंही त्यानंं म्हटलं आहे.