Chetan Zadpe
सॅम पित्रोदा कोणत्याही आपल्या परखड मतांसाठी ओळखले जातात. त्यांनी वारसा हक्क कर संदर्भात अमेरिकन कायद्याचा उल्लेख करून भारतात नव्या वादाला तोंड फोडले आहे.
सॅम पित्रोदा यांचा जन्म 17 नोव्हेंबर 1942 रोजी टिटलागड, ओडिशा येथे झाला. सॅम पित्रोदा हे मूळ गुजराती कुटुंबातील आहेत. त्यांच्यावर गांधीवाद या विचारांचा प्रभाव आहे.
सॅम पित्रोदा यांनी बडोदाच्या महाराजा सयाजीराव विद्यापीठातून भौतिकशास्त्रात एम.ए. केले. पित्रोदा 1964 मध्येच अमेरिकेला गेले होते. शिकागो येथे त्यांनी इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकीमध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. दोन वर्षे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी 1966 मध्ये शिकागो येथे काम करण्यास सुरुवात केली.
सॅम पित्रोदा 1981 मध्ये भारतात परतले. भारतातील दूरसंचार प्रणालीचे आधुनिकीकरण आणि प्रगती हे त्यांचे ध्येय होते.
भारतात त्यांची इंदिरा गांधीची भेट झाली. यानंतर भारतात काम करण्यासाठी सॅम पित्रोदा 1984 मध्ये भारतात कायमचे राहायला आले. आणि पुन्हा भारतीय नागरिकत्व मिळवले. भारतात त्यांनी दूरसंचार क्षेत्रातील अनेक संशोधन आणि विकास कामांना चालना दिली.
सॅम पित्रोदा 1987 मध्ये माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे सल्लागार बनले आणि त्यांनी दूरसंचार, पाणी, साक्षरता, लसीकरण, दुग्धव्यवसाय आणि तेलबिया या क्षेत्रातील मोहिमा सुरू केल्या. सॅम पित्रोदा यांनी जवळपास एक दशक राजीव गांधींसोबत काम केले.
देशाच्या कानाकोपऱ्यात दूरसंचार तंत्रज्ञानाची पोहोच वाढवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. 1995 मध्ये त्यांना वर्ल्डटेलचे पहिले अध्यक्ष बनवण्यात आले.
यानंतर 2004 मध्ये डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली यूपीए सरकार स्थापन झाल्यावर सॅम पित्रोदा यांना राष्ट्रीय ज्ञान आयोगाचे अध्यक्ष बनवण्यात आले. ते 2005 ते 2009 पर्यंत ज्ञान आयोगाचे अध्यक्ष होते.