Deepak Kulkarni
संभाजी भिडे हे महाराष्ट्रात कार्यरत असलेल्या 'शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान' या संस्थेचे संस्थापक व प्रमुख आहेत.
संभाजी भिडे हे सांगलीत राहतात. त्यांचं वय 80 आहे.
त्यांचे मूळ नाव मनोहर भिडे असून ते त्यांचं मूळ गाव सातारा जिल्ह्यातील सबनीसवाडी आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सांगलीतले तत्कालीन प्रमुख कार्यकर्ते बाबाराव भिडे यांचे ते पुतणे आहेत.
त्यांचं शिक्षण एमएस्सीपर्यंत झालं आहे. ते एक महाराष्ट्रातील प्रखर हिंदुत्वाचे पुरस्कर्ते आहेत.
1980 च्या दशकाच्या उत्तरार्धात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान ही स्थापन करण्याआधी भिडे हे हिंदू-राष्ट्रवादी संघटना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्णवेळ कार्यकर्ता होते.
भिडे यांच्या श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थाननं रायगडावर 32 मण इतक्या वजनाच्या सोन्याचं सिंहासन बसवण्याचा संकल्प केला आहे. तसेच धर्मवीर संभाजी महाराज बलिदान मास, दुर्गामाता दौड, धारातीर्थ यात्रा, शिवराज्यभिषेक दिन असे विविध उपक्रम राबवले जातात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भिडे यांची भेट 2014च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान रायगड इथं झाली होती. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही त्यांचे संबंध असल्याचे अनेकदा दिसून आले आहेत.
डोक्यावर भगवा फेटा अन् हातात काठी घेऊन 'धारकरी' नावानं संबोधले जाणारे शिवप्रेमी मोठ्या संख्येनं त्यांच्या दरवर्षीच्या धारातीर्थ यात्रा असो वा दुर्गामाता दौड यात सहभागी होताना दिसतात.