Deepak Kulkarni
मुंबई, पुणे, कोकणासह महाराष्ट्रासह जगभरात जेथे जेथे मराठी कुटुंब आहेत, ते सर्वजण अतिशय श्रद्धेनं,मनोभावे आपल्या घरी गणेश मूर्तींची स्थापना करतात. सार्वजनिक गणेशोत्सवही धुमधडाक्यात साजरा केला जातो.
गणपती बाप्पाची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत असतो. गणेश मंडळांकडून आकर्षक भव्यदिव्य सजावट, विविध पौराणिक, सामाजिक, देशभक्तीपर प्रबोधनात्मक देखावे सादर केले जातात.
पण महाराष्ट्रात असंही एक गाव आहे, जिथे गणेशोत्सव साजरा होतो, पण कुणीच गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करत नाही.
सातारा जिल्ह्यात आणि कृष्णा नदीकाठी अंगापूर नावाचं एक सुंदर व अनोखे गाव आहे. या घरी वा सार्वजनिक ठिकाणी वर्षानुवर्षे गणेशमूर्तींची स्थापना केली जात नाही.
अंगापूर गावात याच भाद्रपद महिन्यात मंदिराच्या आवारातच ‘गणेशभद्रोत्सव’ मोठ्या उत्साहानं अनेक दिवस साजरा केला जातो. त्यातही गणेशचतुर्थी आणि पंचमी हे दोन दिवस उत्सवाचे मुख्य दिवस मानले जातात.
अंगापूर गावात या उत्सवाच्या कालावधीत दर्शनासाठी भाविकांच्या मोठ्या रांगा लागतात. या गावात गणेशाची स्वयंभू मूर्ती असल्यामुळे स्वतंत्र मूर्ती बसवण्याची प्रथा नाही, अशी माहिती ग्रामस्थ सांगतात.
अंगापूर या गावात गेल्या 350 वर्षांपेक्षा अधिक काळापासून घराघरांमध्ये किंवा सार्वजनिक मंडळात स्वतंत्र गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली जात नाही.
एकीकडे सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम सुरु असताना स्वयंभू गणेशमूर्ती असलेलं अंगापूर मात्र, आपली अनोखी परंपरा जपताना दिसून येत आहे.
अंगापूरमधील सोनार समाजातील काही गणेशभक्त 350 वर्षांपूर्वी संकष्टी चतुर्थी निमित्त मोरगावला दर्शनासाठी पायी जात होते. त्यानंतर उत्सव आणि परंपरेची सुरुवात झाल्याची आख्यायिका ग्रामस्थ सांगतात.