Hrishikesh Nalagune
साताऱ्यात इंग्रजांविरोधात उभारलं होतं ‘प्रतिसरकार’
१९४२ मध्ये महात्मा गांधींनी ‘चले जाव’चा नारा दिल्यानंतर ब्रिटिशांविरोधातील आंदोलन तीव्र झाले. साताऱ्यात या लढ्याने वेगळेच रूप घेतले.
क्रांतिसिंह नाना पाटील, जी. डी. बापू लाड आणि नागनाथअण्णा नायकवडी यांच्या नेतृत्वाखाली प्रतिसरकारची उभारणी झाली.
जुन्या सातारा जिल्ह्यातील जवळपास ६५० गावांमध्ये ब्रिटिश प्रशासनाला आव्हान देत प्रतिसरकारने स्वतःचा कारभार सुरू केला. कुंडल हे त्याचे प्रमुख केंद्र बनले.
सावकारीला विरोध, जमिनीचे फेरवाटप, शिक्षणाचा प्रसार, अस्पृश्यता निवारण आणि हुंडाबंदी अशा अनेक सामाजिक-आर्थिक सुधारणा प्रतिसरकारने राबवल्या.
कुंडलमध्ये तरुणांना लष्करी कवायती आणि शस्त्रप्रशिक्षण दिले जात होते. या भूमिगत सेनेने ब्रिटिश यंत्रणेला मोठा धक्का दिला.
तुफान सेनेने सरकारी तिजोरीवर कारवाया केल्या, रेल्वे मार्ग रोखले आणि टपाल सेवा विस्कळीत करून ब्रिटिश प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे केले.
ब्रिटिशांनी नेत्यांना पकडण्यासाठी मोठी मोहीम उघडली. मात्र स्थानिक जनतेचा पाठिंबा आणि डोंगर-दऱ्यांचा आधार घेत क्रांतिकारकांनी दीर्घकाळ कारभार सुरू ठेवला.
जुलै १९४३ मध्ये अधिकृतपणे सुरू झालेले हे प्रतिसरकार सुमारे ३३ महिने टिकले. ब्रिटिश राजवटीला थेट आव्हान देणाऱ्या या प्रयोगाने स्वराज्याची झलक दाखवली.
‘पत्री सरकार’चा लढा हा केवळ ब्रिटिशांविरोधातील संघर्ष नव्हता; तो सामाजिक न्याय, लोकशाही आणि स्वाभिमानासाठीचा ऐतिहासिक प्रयोग होता.