Jagdish Patil
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचे जवळचे सहकारी सर्जियो गोर यांची भारतातील अमेरिकेचे राजदूत म्हणून नियुक्ती केली आहे.
भारत-अमेरिकेतील व्यापारी संबंध ताणले असतानाच गोर यांची नियुक्ती केली असून त्यांच्याकडे दक्षिण, मध्य आशियाई बाबींसाठी विशेष दूताची जबाबदारीही दिली आहे.
काही महिन्यांपूर्वी ट्रम्प आणि एलॉन मस्क यांच्यात वाद निर्माण झाला होता. तेव्हा गोर चर्चेत आले. या वादाला तेच कारणीभूत असल्याचं मानलं जातं.
तर मस्क आणि ट्रम्प यांच्यातील वादानंतर मस्क यांनी एका पोस्टमध्ये ज्यांना साप असं संबोधलं होतं ते सर्जियो गोर कोण आहेत ते जाणून घेऊया.
39 वर्षांचे गोर हे भारतातील अमेरिकेचे सर्वात तरूण राजदूत असतील. याआधी ते व्हाईट हाऊसच्या प्रेसिडेंशियल पर्सनल ऑफिसचे डायरेक्टर म्हणून काम करायचे.
गोर हे ट्रम्प यांच्या अध्यक्षीय प्रचार पथकाचा आणि मेक अमेरिका ग्रेट अगेन चळवळीला पाठिंबा देणाऱ्या सुपर पॉलिटिकल ॲक्शन कमिटीचा ही भाग होते.
गोर यांचा जन्म 1986 साली मध्ये उझबेकिस्तान येथे झाला. त्यांचं कुटुंब काही काळ माल्टा येथे वास्तव्यास होतं. त्यानंतर 1999 साली ते अमेरिकेत आले.
लॉस अँजिलिसमध्ये त्यांचं शिक्षण झालं. त्यानंतर जॉर्ज वॉशिंग्टन विद्यापीठात ते शिक्षणासाठी गेले. विद्यार्थी असल्यापासूनच गोर रिपब्लिकन राजकारणाशी संबंधित होते.
त्यांनी स्टीव्ह किंग आणि मिशेल बॅचमन सारख्या कायदे कर्त्यांसाठी प्रवक्ता म्हणून काम केलंय. सिनेटर रँड पॉल यांचे कर्मचारी म्हणून काम करत ते डेप्युटी चीफ ऑफ स्टाफ बनले.
गोर हे 2018 साली पॉलसोबत मॉस्कोला गेले होते. रशिया-अमेरिका संबंधांवर संशोधन करण्यासाठी त्यांनी हा दौरा केल्याचं सांगितलं जातं.