Rajanand More
काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा गुरूवारी (ता. 19) 55 वा वाढदिवस. यानिमित्त विविध क्षेत्रातील अनेकांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह नितीन गडकरी, अखिलेश यादव, लालू प्रसाद यादव, एम. के. स्टॅलिन, तेजस्वी यादव यांच्यासह अनेक नेत्यांनी राहुल यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनीही राहुल यांना सोशल मीडियातून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
राहुल यांनी शुभेच्छांबद्दल आभार व्यक्त करताना खास रिप्लाय दिला. जनमताचा सन्मान आणि महाराष्ट्राला न्याय देण्याच्या प्रयत्नांमध्ये तुमचा अनुभव व संकल्प आम्हाला सातत्याने ताकद देतो, असे राहुल यांनी म्हटले आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांच्या शुभेच्छांवर आभार व्यक्त करताना राहुल यांनीही म्हटले की, महाराष्ट्रपासून दिल्लीपर्यंत, मविआपासून इंडियापर्यंत आपण एकत्रितपणे लोकशाही संस्थांची रक्षा करू आणि न्यायपूर्ण भविष्याचा मजबूत पाया रचू.
राहुल गांधी यांच्याकडून एक्सवर पोस्ट करत काही ठराविक नेत्यांचेच आभार मानण्यात आले. सायंकाळपर्यंत त्यामध्ये केवळ इंडिया आघाडीतील नेत्यांचाच समावेश होता.
काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या शुभेच्छांबद्दल आभार मानताना राहुल म्हणाले, तुमचे प्रेम आणि हिंमत मला प्रेरणा देते. आपण सत्य, न्याय आणि भारतासाठी सोबत उभे आहोत.
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल यांनी लालूप्रसाद यादव आणि तेजस्वी यादव यांचे आभार मानताना आपण एकत्रितपणे बिहारच्या समृध्दी, सन्मान आणि सामाजिक न्यायाची दिशा निश्चित करू, असे म्हटले आहे.