Rashmi Mane
भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून ओळख निर्माण करणारे शेहझाद पूनावाला यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली तरी त्यांच्या सोशल मीडिया प्रोफाइलमधील बदलांमुळे या चर्चेला अधिक बळ मिळाले आहे.
1987 मध्ये पुण्यात जन्मलेल्या शेहझाद पूनावाला यांनी वकील आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणून कारकिर्दीची सुरुवात केली.
2008 पासून शेहझाद पूनावाला काँग्रेसमध्ये सक्रिय झाले. युवक काँग्रेसमध्ये पुण्याचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले. त्यानंतर पक्षाच्या मीडिया सेलमध्ये तसेच महाराष्ट्र काँग्रेसचे सरचिटणीस म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली.
काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित करत त्यांनी पक्ष नेतृत्वावर टीका केली. या वादानंतर त्यांचे काँग्रेसशी मतभेद वाढले आणि अखेर त्यांनी पक्षाचा निरोप घेतला.
गुजरात विधानसभा निवडणुकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेहझाद पूनावाला यांच्या भूमिकेचे सार्वजनिक कौतुक केले. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि लवकरच राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून त्यांची नियुक्ती झाली.
भाजपमध्ये आल्यानंतर पूनावाला हे पक्षाची भूमिका प्रभावीपणे मांडणाऱ्या प्रमुख चेहऱ्यांपैकी एक बनले. समान नागरी संहिता, तीन तलाक, CAA यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर त्यांनी सातत्याने पक्षाची बाजू मांडली.
माध्यमांतील माहितीनुसार, सक्रिय राजकारणातून बाहेर पडण्याचा विचार त्यांनी यापूर्वीच व्यक्त केला होता. 2024 नंतर काही महत्त्वाच्या निवडणुकांपर्यंत पक्षासाठी काम करून नंतर जबाबदारी सोडण्याचा निर्णय त्यांनी घेतल्याचे सांगितले जाते.
शेहझाद पूनावाला यांच्या राजीनाम्याबाबत भाजपकडून अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र त्यांच्या संभाव्य निर्णयामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून, पुढील भूमिका काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.