Deepak Kulkarni
शहजाद पूनावाला हे एक भारतीय राजकारणी असून त्यांची ओळख आक्रमक प्रवक्ते राहिली आहे.
त्यांनी नुकताच भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्तेपदाचा राजीनामा दिला आहे.
शहजाद पूनावाला हे पेशाने वकील असून राजकीय भाष्यकारदेखील आहेत.
2017 मध्ये अध्यक्षपदाच्या निवडणूक प्रक्रियेवरून मतभेद झाल्यानंतर शहजाद पूनावाला यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता.
अभ्यासू वृत्ती आणि आक्रमक वक्तृत्वशैलीमुळे भाजपने त्यांच्यावर राष्ट्रीय प्रवक्तेपदाची जबाबदारी सोपवली होती.
पूनावाला पीएम मोदींचे खंदे समर्थक मानले जातात, पण त्यांनी तडकाफडकी पक्ष सोडला तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाच राजीनामा मागितला आहे. याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत पूनावाला यांनी पंतप्रधानांना गेल्या 12 वर्षांत नीट हुकूमशहा कसे बनायचे हे सुद्धा शिकता आले नाही, असा खोचक टोला लगावला आहे.
आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे पूर्णपणे निराश झालो असून, गेली 12 वर्षे झाली आणि ते अपयशी ठरल्याचेही ते म्हणाले.
हुकूमशहा बनण्याऐवजी, मोदी हे दररोज रात्री एक व्हिडिओ प्रसिद्ध करत आहेत. ज्या मुलांनी त्यांचा अपमान केला, ते घटनात्मक पदावर असतानाही त्यांच्या आईचा अपमान केला. अशा मुलांना ते खोडकर म्हणत, कृपया त्यांना माफ करा, असे आवाहन करत असल्याचं पूनावाला यांनी म्हटलं आहे.