Roshan More
पुणे जिल्ह्यातील एकाही पात्र मतदाराचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, यासाठी पुणे जिल्ह्यात विशेष मतदार नोंदणी मोहीम राबविण्यात येत आहे.
या मोहिमेअंतर्गत १७, १८ तसेच २४ आणि २५ ऑक्टोबर २०२६ रोजी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर विशेष शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत.
नागरिकांनी या शिबिरांमध्ये सहभागी होऊन प्रारूप मतदार यादीतील आपले नाव व तपशील तपासावेत आणि आवश्यक असल्यास २६ ऑक्टोबरपर्यंत दावे व हरकती सादर करता येणार आहे.
या मोहिमेसाठी पुणे जिल्ह्यात २१ मतदार नोंदणी अधिकारी, ६४७ सहायक मतदार नोंदणी अधिकारी आणि ८ हजार ४२४ बूथस्तरीय अधिकारी कार्यरत असतील.
प्रारूप मतदार यादीत नाव आढळले नाही किंवा वैयक्तिक तपशिलात दुरुस्ती आवश्यक असल्यास नागरिकांनी विहित नमुन्यात अर्ज सादर करावा.
नवीन मतदार नोंदणीसाठी नमुना अर्ज क्रमांक ६, मतदार यादीतील नावावर आक्षेप नोंदविण्यासाठी किंवा नियमानुसार नाव वगळण्याची विनंती करण्यासाठी नमुना अर्ज क्रमांक ७, तर निवासस्थानातील बदल, तपशिलातील दुरुस्तीसाठी नमुना अर्ज क्रमांक ८ भरता येतो.
मतदार यादीतील नाव तपासणे, नवीन नोंदणी किंवा अर्ज भरण्यासंदर्भात काही अडचण अथवा तक्रार असल्यास नागरिकांनी ‘१९५०’ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा.