Ganesh Sonawane
संसदेमध्ये उल्लेखनीय आणि सातत्यपूर्ण कामगिरी केल्याबद्दल दिल्या जाणाऱ्या संसदरत्न पुरस्कांराची घोषणा झाली आहे. महाराष्ट्रातील सात खासदांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. यात भाजपच्या जळगावच्या खासदार स्मिता वाघ यांचाही समावेश आहे.
स्मिता वाघ या जळगाव लोकसभा मतदारसंघाचे महिला खासदार म्हणून प्रतिनिधत्व करत आहेत. जळगाव लोकसभा मतदारसंघात पहिल्या महिला खासदार म्हणून येण्याचा बहुमान त्यांनी मिळवला आहे.
लोकसभा निवडणुकीत त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेचे करण पवार यांचा पराभव करत, एकहाती विजय मिळवला होता.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून स्मिता वाघ यांची जडणघडण भारतीय जनता पार्टीमध्येच झाली आहे. त्यांनी याआधीही पक्षासाठी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ते विधान परिषदेचे आमदार ही महत्त्वाची पदे भूषवलेली आहेत.
जळगाव लोकसभेतून २०१९ मध्ये देखील त्यांना उमेदवारी देण्यात आली होती, मात्र ऐन वेळेस त्यांची उमेदवारी नाकारली गेली.
गेल्या निवडणुकीत उमेदवारी नाकारली म्हणून त्यांना २०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये जळगाव लोकसभा मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली.
त्यांचे पती उदय वाघ हे भाजपाचे जळगाव जिल्हा अध्यक्ष होते. पतीच्या निधनानंतर देखील त्यांनी पक्षासाठी स्वतः झोकून काम केले. त्याचमुळे त्यांना जळगाव लोकसभेची उमेदवारी मिळाली.
स्मिता वाघ यांनी पहिल्याच टर्ममध्ये वर्षभरात केलेल्या कामगिरीची दखल घेत त्यांना संसदरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे.