Rajanand More
दिल्लीत ‘अॅम्ब्युलन्स मॅन’ म्हणून प्रसिध्द असलेले जितेंद्र सिंग शंटी यांनी गुरूवारी अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीत ‘आप’मध्ये प्रवेश केला.
शंटी हे भाजपचे माजी आमदार होते. 2013 मध्ये दिल्लीतील शहादरा मतदारसंघातून निवडून आले होते. ते दोनदा नगरसेवकही होते.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ‘आप’ने त्यांना पक्षात आणत मोठी संधी साधली आहे. त्यांना शहादरा मतदारसंघातून तिकीट मिळण्याची शक्यता आहे.
शंटी हे सामाजिक कार्यकर्ते म्हणूनही प्रसिध्द असून त्यांना भारत सरकारने पद्मश्री किताब देऊन सन्मानितही केले आहे.
कोरोना काळात शंटी यांनी रुग्णांना रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यासाठी खूप प्रयत्न केले होते. त्यामुळे त्यांना अम्ब्युलन्स मॅन म्हणूनही ओळखले जाते.
आतापर्यंत त्यांनी 70 हजारांहून अधिक मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले आहेत. कोरोनामध्ये लोकांकडून नातेवाईकांचे मृतदेह स्वीकारले जात नसताना शंटी यांनी अशा मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले.
शंटी हे मागील अनेक वर्षांपासून शहीद भगत सिंग सेवा दल फाऊंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्यात सक्रीय आहेत.
शंटी यांच्या भगिनी व ‘आप’च्या नगरसेविका प्रीती गुप्ता यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर काही दिवसांतच शंटी ‘आप’मध्ये आले आहेत.