सरकारनामा ब्यूरो
आपली आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. पण माझ्या मुलींना चांगले शिक्षण मिळावे एवढं एकच ध्येय ठेऊन सोलापूर शहरात राहणारे ज्योतिराम भोजने यांनी गॅरेज चालवून त्यांच्या मुलींना शिकवले.
वडिलांचे कष्ट व त्यांच्या जिद्दीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या संजीवनी आणि सरोजिनी या दोन्ही मुलींनी ‘एमपीएससी’ परीक्षेत यश मिळविले आहे.
दोन्ही बहिणी या सोलापुर येथील गवळी वस्तीमध्ये एका पत्र्याच्या घरात राहतात. या दोघींनी बी.कॉम. झाल्यावर २०१८ पासून ‘एमपीएससी’ परीक्षेची तयारी सुरू केली होती.
दोन्ही बहिणींनी सात वर्षांत ‘एमपीएससी’च्या एकूण सहा मुख्य परीक्षा दिल्या.मात्र, अनेकवेळा काही गुणांमुळेच त्यांना परीक्षेत अपयश येत होते. त्यांनी हार न मानता त्यांचे प्रयत्न सुरुच ठेवले.
मुलीचे वय वाढत होते, पण आई-वडिलांना त्यांच्या दोन्ही मुलींवर विश्वास होता की, त्या एकदिवस नक्की यशस्वी होतील. म्हणून त्यांनी लग्नाची घाई केली नाही.
अखेर (ता. 11) मंगळवारी ‘एमपीएससी’ परीक्षेचा निकाल लागला आणि यात दोन्ही बहिणी उत्तीर्ण झाल्या.
संजीवनीची मंत्रालयात महसूल विभागात लिपिक पदावर, तर सरोजिनीची महसूल साहाय्यक आणि कर साहाय्यक या दोन्ही पदांसाठी निवड झाली आहे.