Rajanand More
नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात ईडीने काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि इतर काही जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे.
आतापर्यंत सोनिया गांधी यांच्याविरोधात एकदाही आरोपपत्र दाखल झालेले नाही. नॅशनल हेरॉल्ड केसमध्ये पहिल्यांदाच त्यांच्यावर ही वेळ आली आहे. यामध्ये त्यांच्या नावासमोर आरोपी क्रमांक 1 म्हटले आहे.
राहुल गांधी यांना आरोपी क्रमांक 2 करण्यात आले आहे. त्यांच्यासोबत सुमन दुबे, सॅम पित्रोदा, यंग इंडियन कंपनी, डॉटेक्स कंपनी आणि सुनील भंडारी हेही आरोपी आहेत.
सोनिया आणि राहुल गांधी यांनी यंग इंडियाच्या माध्यमातून असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड (AJL)ची 2 हजार कोटींची संपत्ती मनी लॉन्ड्रिंगद्वारे हडपण्यात आल्याचा आरोप आहे. यातून 988 कोटी रुपये बेकायदेशीरपणे कमविण्यात आल्याचे ईडीने म्हटले आहे.
यंग इंडियनमध्ये सोनिया आणि राहुल यांची एकूण 76 टक्के भागीदारी होती. काँग्रेस कमिटीने एजेएलला आधी 90.21 कोटी कर्ज दिले होते. नंतर ते 9.02 कोटी शेअर्समध्ये बदलून यंग इंडियनला केवळ 50 लाखांत दिल्याचे आरोपपत्रात नमूद केले आहे.
सोनिया गांधी यांचे जावई व प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा हेही अडचणीत आले आहेत. गुरूग्राम आणि बिकानेर येथील जमीन व्यवहारामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप ईडीने केला आहे.
वाड्रा यांची ईडीने सलग दोन दिवस चौकशी केली आहे. बुधवारी (ता. 16 एप्रिल) प्रियांका गांधीही ईडी कार्यालयात आल्या होत्या. वाड्रा यांना अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राहुल गांधी यांच्याविरोधात देशात अनेक ठिकाणी मानहानीचे खटले सुरू आहेत. एका प्रकरणात त्यांना दोन वर्षांची शिक्षाही झाल्याने खासदारकी गेली होती. सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्यानंतर ती वाचली. पण त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार कायम आहे.