Rajanand More
दक्षिण कोरियामध्ये रविवारी (ता. 29 डिसेंबर) जेजू एअर कंपनीचे बोइंग 737-800 विमान धावपट्टीवर घसरून सुरक्षाभिंतीला धडकल्याने भीषण अपघात झाला. अपघातानंतर विमानाला आग लागली.
विमानात कर्मचाऱ्यांसह 181 जण होते. अपघातामध्ये 179 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर या अपघातातून केवळ दोन जण बचावले आहेत.
दक्षिण कोरियातील स्थानिक वेळेनुसार, हे विमान सकाळी 9 वाजून सात मिनिटांनी अपघातग्रस्त झाले. मुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावर ही दुर्घटना घडली आहे.
काही तांत्रिक कारणांमुळे पायलटला पहिल्या प्रयत्नात विमान उतरवता आले नव्हते. त्यामुळे बेली लँडिंगचा प्रयत्न करण्यात आला. पण धावपट्टी संपेपर्यंत वेग कमी झाला नाही. त्यामुळे अपघात झाला.
बेली लँडिंग हा आपत्कालीन परिस्थितीत विमान उतरवण्याचा एक प्रकार आहे. विमानाचे लँडिंग गियर (चाके) काम करत नाहीत तेव्हा विमान त्याच्या तळाशी म्हणजे पोटावर उतरवले जाते.
विमानामध्ये बहुतेक प्रवासी हे दक्षिण कोरियातीलच होते. हे विमान देशांतर्गत प्रवासी वाहतूक करत होते. त्यामुळे हा या देशासाठी मोठा हादरा आहे.
पक्षांच्या थव्याला धडक बसून अनेकदा विमान अपघात होण्याचा धोका असतो. पक्षी धडकून तांत्रिक बिघाड झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. हा अपघातही असाच झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
जेजू एअर च्या इतिहासात रविवारी झालेला अपघात पहिलाच सर्वात मोठा होता. यापूर्वी 2007 मध्ये एक किरकोळ अपघात झाला होता. त्यामध्ये एक प्रवासी जखमी झाला होता.
2024 या वर्षात विमानांचे सहा मोठे अपघात झाले असून त्यामध्ये 234 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये आजचा अपघात सर्वात मोठा होता.
कझाकिस्तानमध्ये चार दिवसांपूर्वीच झालेल्या विमान अपघातात 38 प्रवाशांचा मृत्यू झाला. आपत्कालीन लँडिंगदरम्यान विमान धावपट्टीवर उतरू शकले नाही.