Roshan More
दुष्काळी पार्श्वभूमीवर भाऊबीजेच्या दिवशी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी बारामती तालुक्यातील मुर्टी येथील सोनकरवस्तीवर जाऊन शेतकरी कुटुंबीयांशी संवाद साधला.
त्यांच्या घरात सर्वांसोबत दिवाळीचा फराळ आणि झुणका-भाकर खाऊन त्यांनी भाऊबीज साजरी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेत दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला.
सुनेत्रा पवार यांनी शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचा विश्वासही दिला.
सोनकरवस्तीवरील शेतकरी कुटुंबीयांशी संवाद साधताना पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, शेतीसाठी पाणी आणि जनावरांच्या चाऱ्याची परिस्थिती याबाबत उपमुख्यमंत्री पवार यांनी माहिती घेतली.
सुपे सात गाव पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण करून परिसरातील गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल,अशी माहितीही त्यांनी दिली.
शेतकऱ्यांनी अग्रीम मदतीसोबतच कर्जमाफीचा लाभ मिळाल्याचे तसेच प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचे पैसेही खात्यात जमा झाल्याचे सुनेत्रा पवार यांना सांगितले.
बारामती तालुक्याच्या विकासासाठी अजितदादांनी अनेक स्वप्ने पाहिली होती. ही सर्व स्वप्ने आपण एकत्रितपणे पूर्ण करू, असे त्या म्हणाल्या.
सोनकरवस्तीवरील भेटीनंतर उपमुख्यमंत्री पवार यांनी जोगवाडी येथे जाऊन शिवाराची पाहणी केली. अंबी येथे एका शेतकऱ्याच्या घरी भेट देऊन कुटुंबीय व ग्रामस्थांशी संवाद साधला.