सरकारनामा ब्यूरो
भारतीय वंशाच्या नासाच्या अंतराळवीर सुनिता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर यांचे बुधवारी (ता.19) पहाटे पृथ्वीवर आगमन झाले आहे.
अंतराळात नऊ महिने घालवल्यानंतर, सुनीता विल्यम्स अखेर पृथ्वीवर सुरक्षित परतल्यामुळे संपूर्ण देशात कौतुक होत असून आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यातील झुलासन गावात सुनीता यांचे वडील दीपक पंड्या यांचा जन्म झाला. ते 1957 ला अमेरिकेला गेले. आणि ते तेथेच स्थायिक झाले.
सुनीता वडीलांच्या गावी 2006 ते 2013 मध्ये आल्या होत्या. आपल्या देशाची आणि गावाची लेक पृथ्वीवर सुरक्षित आल्याने तेथील गावकऱ्यांचा आनंद गगनात मावत नसल्याचे चित्र पाहायला मिळाले.
झुलासन या गावातील गावकऱ्यांनी सुनीता पृथ्वीवर सुरक्षित याव्यात, यासाठी 9 महिन्यांपासून 'अखंड ज्योत' प्रज्वलित करून प्रार्थना करीत होते.
त्या पृथ्वीवर परतल्यानंतर गावातील लोकांनी आतिषबाजी आणि ढोल वाजवत एकमेकांना गुलाल लावत आनंद साजरा केला.
सुनीता यांचे चुलत भाऊ नवीन पांड्या यांनी त्यांच्या सन्मानार्थ गावातून भव्य रॅली काढणार असल्याचे सांगितले आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा जन्म मेहसाणा जिल्ह्यातील वडनगर या गावात झाला आहे. सुनीता यांच्या वडिलांचा आणि पीएम मोदी यांचा जन्म एकाच जिल्ह्यात झाला आहे.