Rajanand More
राजकारणात सक्रीय झालेले दक्षिणेतील सुपरस्टार थलापती विजय यांच्या सभांना तमिळनाडूत प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. त्यांच्यासाठी होणारी गर्दी पाहून विरोधकांना धडकी भरत आहे.
तमिळनाडूतील करूर येथे 27 सप्टेंबरला झालेल्या रॅलीतही प्रचंड गर्दी झाली होती. पण यामध्ये चेंगराचेंगरी झाल्याने 41 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले आहेत.
घटनेनंतर पोलिसांनी विजय यांच्यावर ठपका ठेवला आहे. सभेच्या ठिकाणी ते जाणीवपूर्वक उशिराने आले. जेणेकरून आणखी गर्दी वाढेल. अत्यंत कमी जागेत 25 हजारांहून अधिक लोक आल्याने चेंगराचेंगरी झाल्याचे पोलिसांनी एफआयआऱ मध्ये म्हटले आहे.
सरकारने चौकशीसाठी न्यायालयीन समिती नेमली आहे. या समितीकडूनही विजय यांच्यावर ठपका ठेवला जाऊ शकतो. त्यामुळे सरकारकडून विजय यांना अटक होईल, अशी भीती त्यांच्या चाहत्यांकडून व्यक्त केली जात आहे.
विजय यांच्या पक्षातील नेत्यांनीही सरकारकडूनच हे षडयंत्र रचण्याचा आरोप केला आहे. परिसरातील वीज जाणीवपूर्वक घालविण्यात आली. त्यामुळे लोकांमध्ये गोंधळ उडाली आणि चेंगराचेंगरी झाली, असा आरोप होत आहे.
विजय यांचा राजकीय गेम करण्याचा हा डाव असल्याचा आरोप नेत्यांनी केला आहे. त्यामुळे तमिळनाडूच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे.
राज्यात पुढीलवर्षी विधानसभेची निवडणूक आहे. यापार्श्वभूमीवर विजय यांना मिळणारा लोकांचा प्रतिसाद पाहता सत्ताधारी द्रमुक पक्षाची चिंता वाढल्याचे बोलले जात आहे.
विजय यांना मिळणारा प्रतिसाद कायम राहिल्यास एम. के. स्टॅलिन यांच्या सत्तेला सुरूंग लागू शकते, अशीही चर्चा आहे. त्यामुळेच सुरूवात होण्याआधीच विजय यांच्या राजकीय करिअरला ब्रेक लावण्याचे प्रयत्न सुरू असल्याची भीती त्यांच्या पक्षातील नेत्यांनी व्यक्त केली आहे.