Rajanand More
भारताचे सरन्यायाधीश म्हणून धनंजय चंद्रचूड सोमवारी सेवानिवृत्त होणार आहेत. शुक्रवारी त्यांच्या कामकाजाचा अखेरचा दिवस होता. त्यांनी विविध मुद्यांवर आपल्या भावना व्यक्त केल्या.
माझ्या शब्दांनी किंवा कृतीने कुणी दुखावले असेल तर मला माफ करा, अशी भावना चंद्रचूड यांनी व्यक्त केली.
आपण न्यायाधीश म्हणून जे निकाल देतो त्याचा अनेकदा सामान्य लोकांच्या जीवनावर प्रभाव पडतो, असे माजी सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले.
न्यायालयांनी केवळ कागदपत्रांच्या आधारे नव्हे तर लोकांच्या जीवनावर होणाऱ्या परिणामांच्या आधारेही निकाल द्यायला हवेत, असा सल्लाही चंद्रचूड यांनी यावेळी दिला.
ज्यांना आपण कधी भेटलो नाही, ओळखतही नाही, अशा गरजूंची सेवा करू शकलो, यापेक्षा मोठी भावना कोणतीही असू शकत नाही, असे चंद्रचूड म्हणाले.
न्यायव्यवस्थेची महान परंपरा सांगताना ते म्हणाले, अनेक महान न्यायाधीशांनी हे न्यायालय सजवले आहे. त्यामुळेच ते आज उच्च शिखरावर पोहचले आहे.
कदाचित आपण सर्वाधिक ट्रोल झालेलो न्यायाधीश असू, असे सांगताना चंद्रचूड यांनी आपल्या विरोधकांचा आदरच असल्याचेही ते म्हणाले.
कारकीर्दीत अनेकदा टीकेला सामोरे जावे लागल्याचे सांगताना त्यांनी आपल्यावर झालेल्या सर्व टीका पेलण्यासाठी माझे खांदे मजबूत असल्याची भावना चंद्रचूड यांनी व्यक्त केली.
धनंजय चंद्रचूड यांच्या काही निर्णयांमुळे टीका झाली, सोशल मीडियात ट्रोलिग झाली. आता सोमवारपासून ट्रोल करणारे बेरोजगार होतील, अशी मिश्कील टिप्पणीही त्यांनी केली.
वडिलांनी कधीच आपल्यावर काही थोपवले नाही, मात्र ते कडक शिस्तीचे होते. त्यांचे जीवन आणि मार्गदर्शन आपल्यासाठी मार्गदर्शक ठरल्याची भावना चंद्रचूड यांनी व्यक्त केली.
आईचे आशीर्वाद आणि त्यांनी केलेल्या संस्काराचे महत्वही धनंजय चंद्रचूड यांनी सांगितले. आपल्या निर्णयांमध्ये आईनेही कधीही हस्तक्षेप केला नसल्याचेही त्यांनी नमूद केले.