Rashmi Mane
मागील काही दिवसापासून राज्यात हिंदीविरोधातील वातावरण चांगलंच तापलं आहे. यात आता आणखी एका व्यापाऱ्यानं "मी मराठी बोलणार नाही, काय करायचंय ते करुन घ्या" अशा शब्दांत सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.
शेअर मार्केट तज्ज्ञ आणि व्यापारी केडिया यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना टॅग करुन त्याना थेट आव्हानच दिलं आहे.
सुशील केडिया हे फायनान्शिअल एक्सपर्ट असून शेअर बाजाराच्या व्यवसायात काम करतात. 'केडियानॉमिक्स' नावाची त्याची कंपनी असून या कंपनीचे ते संस्थापक आणि सीईओ आहेत. शेअर बाजारात ट्रेडिंगचा या कंपनीचा व्यावसाय आहे.
दोन मोठ्या हेज फंड्ससाठी ते काम करतात. तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणूक बँकांमध्ये त्यांचा मोठा अनुभव आहे.
"मी गेल्या ३० वर्षांपासून मुंबईत राहतो तरी देखील मला मराठी व्यवस्थित येत नाही. पण हिंदी भाषिकांना तुम्ही देत असलेल्या वाईट वागणुकीमुळं मी आता असा निश्चिय केला आहे", असं त्यांचं म्हणणं आहे.
सुशील केडिया यांनी मराठी शिकण्यास नकार दिला. त्यांच्या विधानाने मराठी भाषाप्रेमींमध्ये संताप निर्माण झाला आहे. मराठी आणि हिंदीच्या वादातून प्रादेशिक अस्मिता आणि भाषेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
या प्रकरणामुळे मराठी माणसाचा आवाज उठवण्याची गरज या प्रकरणामुळे अधोरेखित झाली आहे. या विवादामुळे सोशल मीडियावर दोन गटांमध्ये चांगलीच चर्चा जुंपली आहे.