Vijaykumar Dudhale
सुशीलकुमार शिंदे यांचा जन्म सोलापूरमध्ये 4 सप्टेंबर 1941 रोजी झाला. त्यांचे बालपण प्रचंड हलाखीत गेले. आठवी पास झाल्यानंतर त्यांना सोलापूरच्या न्यायालयात शिरस्तेदाराची (शिपाई) नोकरी मिळाली. वकिलांना पुकारायचे ते काम होते. दहा वर्षे नोकरी केल्यानंतर त्यांना क्लर्कपदी बढती मिळाली.
बीएची पदवी घेतल्यानंतर ते नोकरीचा राजीनामा देऊन पुण्याला कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी गेले. पुण्यातील विधी महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांची शरद पवारांशी भेट झाली. शिक्षण सुरू असतानाच त्यांना पोलिस उपनिरीक्षकपदाची नोकरी मिळाली. नोकरी करतच त्यांनी कायद्याचे शिक्षण पूर्ण केले.
शिंदे यांची सीआयडीमध्ये बदली झाली. पोलिस निरीक्षक असल्याने त्यांचा राज्यकर्त्यांशी संबंध यायचा. मुंबईत पुन्हा एकदा शरद पवारांची भेट झाली आणि त्यातून घट्ट मैत्री झाली. पवारांनी शिंदे यांना राजकारणात आणले. ता. 6 नोव्हेंबर 1971 रोजी शिंदे यांनी नोकरीचा राजीनामा दिला आणि 9 नोव्हेंबरपासून सोशॅलिस्ट फोरमचा निमंत्रक म्हणून कामाला सुरुवात केली.
करमाळा मतदारसंघातून त्यांना 1972 मध्ये काँग्रेसचे तिकीट मिळणार होते. मात्र, ते ऐनवेळी रद्द झाले. पुढे करमाळ्याच्या आमदाराचे आकस्मिक निधन झाल्याने पोटनिवडणूक लागली. शिंदे यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आणि विजय संपादन करून ते 23 एप्रिल 1973 रोजी पहिल्यांदा आमदार झाले.
सुशीलकुमार शिंदे यांनी 1974, 1980, 1985, 1990, 1992, 24 मे 2003 ते ऑगस्ट 2004 ( पोटनिवडणूक), सप्टेंबर 2004 ते 2 ऑक्टोबर 2004 विधानसभेच्या निवडणुका जिंकल्या आहेत. त्यांनी महाराष्ट्राचे अर्थमंत्री म्हणून सलग नऊ वेळा अर्थसंकल्प मांडला. त्यांनी 1992 ते 1997 दरम्यान आणि त्यानंतर 2006 मध्येही राज्यसभेवर काम केले.
सुशीलकुमार शिंदे यांनी आंध्र प्रदेशचे राज्यपाल म्हणूनही काम केले आहे. तसेच, उपराष्ट्रपतिपदाची निवडणूकही लढवली. मात्र, त्यात त्यांना अपयश आले. मात्र, ते पुन्हा सक्रिय राजकारणात आले.
सोलापुरातून शिंदे यांनी 2009 ची लोकसभा निवडणूक जिंकली. प्रणव मुखर्जी राष्ट्रपती झाल्यानंतर ते लोकसभेतील नेते झाले. लोकसभेच्या नेतेपदी निवड होणारे ते पहिले मराठी नेते आहेत. यूपीए सरकारमध्ये ते पहिल्यांदा ऊर्जामंत्री, तर त्यानंतर थेट केंद्रीय गृहमंत्री बनले. त्यांच्याच काळात अतिरेकी अजमल कसाब आणि अफझल गुरू यांना फाशी देण्यात आली.
सुशीलकुमार शिंदे हे 16 जानेवारी 2003 रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले. ते 1 नोव्हेंबर 2004 पर्यंत या पदावर होते. कोर्टातील पट्टेवाला ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशी त्यांची कामगिरी राहिली आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणातील स्ट्रेट फॉरवर्ड नेता : पृथ्वीराज चव्हाण