Rajanand More
बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांचे पुत्र तेजप्रताप यादव आणि माजी मुख्यमंत्री दरोगा राय यांची नात ऐश्वर्या यांचा मे २०१८ मध्ये विवाह झाला होता.
दोन माजी मुख्यमंत्र्यांच्या घरातील लग्नकार्य असल्याने मोठा थाटमाट होता. राजकीय क्षेत्रातील अनेक बडे नेते, उद्योगपती तसेच इतर क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
लग्नाला सहा महिने झाल्यानंतरच तेजप्रताप यांनी कोर्टात घटस्फोटाचा दावा दाखल केला. दोघांमधील वादविवाद टोकाला गेल्याचे सांगितले जात होते.
ऐश्वर्या राय यांनीही तेजप्रतापसह कुटुंबातील इतर सदस्यांवर कौटुंबिक छळ केल्याचा आरोप करणारी याचिका कोर्टात दाखल केली.
दोघांमधील घटस्फोट आणि कौटुंबिक छळाच्या याचिकांवर अजूनही कोर्टात सुनावणी सुरू आहे. त्यामुळे सध्यातरी ते दोघेही कायदेशीर पती-पत्नी आहेत.
तेजप्रताप आणि ऐश्वर्या यांचा विवाह दोन्ही घरातील ज्येष्ठांनी एकत्रित येत ठरवला होता. नंतर तेजप्रताप यांनी सहा महिन्यांनी आपल्या मनाविरोधात विवाह झाल्याचा दावा केला होता.
ऐश्वर्या या माघार घेण्यास तयार नाहीत. त्यांची लढाई कोर्टात सुरू आहे. तेजप्रताप यांची लव्हस्टोरी समोर आल्यानंतर त्यांनी लालूंच्या कुटुंबावर अनेक गंभीर आरोप केले आहेत.
ऐश्वर्या या उच्चशिक्षित आहेत. त्यांचे एमबीएपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. माजी मंत्री चंद्रिका राय यांच्या त्या कन्या आहेत. राय हे लालूंच्या राष्ट्रीय जनता दलाचे नेते होते.