Jagdish Patil
दुबईतील एअर-शोदरम्यान भारतीय हवाई दलाचे 'तेजस' हे लढाऊ विमान कोसळून विंग कमांडर नमांश सियाल यांचा मृत्यू झाला.
या दुर्घटनेचा सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ पाहून अनेकांनी हळहळ व्यक्त केली.
तर या घटनेमुळे हिमाचल प्रदेशमधील कांगडा जिल्ह्यातील नगरोटा बागवान या नमांश सियाल यांच्या गावावर शोककळा पसरली.
भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर असलेले 34 वर्षीय नमांश सियाल हे 19व्या दुबई एअर शोमध्ये 'तेजस' हे भारतीय बनावटीचे लढाऊ विमान उडवत होते.
हे विमान कोसळल्याने त्यांचा अपघाती मृत्यू झाला. नमांश हे हैदराबाद एअर बेसमध्ये तैनात होते.
त्यांच्या पश्चात आई-वडील, सहा वर्षांची मुलगी आणि भारतीय हवाई दलात अधिकारी असलेल्या पत्नी असा परिवार आहे.
नमांश यांच्या पत्नी अफसान या देखील हवाई दलात अधिकारी आहेत. तर वडील जगन नाथ सैन्य दलातून निवृत्त झालेत.
निवृत्तीनंतर त्यांच्या वडिलांनी हिमाचल प्रदेशच्या शिक्षण विभागात मुख्याध्यापक म्हणून काम केलं होतं.
'देशाने एक साहसी आणि कर्तव्यनिष्ठ पायलट गमावला', अशा शब्दात हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुखू यांनी नमांश यांना श्रद्धांजली वाहिली.