Ganesh Sonawane
महाराष्ट्राचे राजकारण सध्या ठाकरे बंधूंच्या संभाव्य मनोमिलनावरुन ढवळून निघालं आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र आणि मराठीसाठी एकत्र येण्याची तयारी दर्शवत हात पुढे केला आहे. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
जर उद्धव ठाकरे व राज ठाकरे एकत्र आलीत तर पुढील पाच कारणे त्यासाठी कारणीभूत ठरु शकतात.
राजकारणात सत्ता मिळवण्यासाठी कोणताही प्रयोग कधीही केला जाऊ शकतो. त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकमेकांचे राजकीय विरोधक असले तरी ते आगामी महापालिकेच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून एकत्र येऊ शकतात.
ठाकरे आडनाव राज आणि उद्धव यांच्यातील एक समान धागा आहे. ते दोघेही एकमेकांचे चुलत भाऊ आहेत. एकाच घराण्यातून येत असल्याने आणि दोन्ही पक्ष बाळासाहेबांचा विचार पुढे नेत असल्याने ते भविष्यात एकत्र येण्यास काहीही हरकत नसल्याचे राजकीय जाणकार सांगतात.
मराठी अस्मिता हा मनसे आणि ठाकरे यांची शिवसेना या दोन्ही पक्षांचा समान धागा आहे. त्यामुळे हाच मराठी अस्मितेचा मुद्दा लक्षात घेऊन हे दोन्ही पक्ष एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यासोबतच मनसे आणि ठाकरेंची शिवसेना हे दोन्ही पक्ष हिंदुत्त्वाच्या विचारधारेला मान्य करणारे आहेत. त्यामुळेच या हिंदुत्त्वाच्या समान धाग्याला लक्षात घेता हे दोन्ही पक्ष एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी हे नवे समीकरण उदयास आलेले आहे. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकांमध्ये समीकरणं वेगळी असतात. त्यात दोघे भाऊ एकत्र आल्यास वेगळा निकाल लागू शकतो.