Rashmi Mane
सातारा आणि कोल्हापूरच्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील वाघ आता स्थानिकांसाठी केवळ वन्य प्राणी राहिलेले नाहीत, तर त्यांच्या हृदयातील मानाचे स्थान मिळाले आहे.
येथे वास्तव्य करणाऱ्या तीन नर वाघांना स्थानिक रहिवाशांनी आपुलकीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या सरदारांची नावे दिली आहेत – ‘सेनापती’, ‘सुभेदार’ आणि ‘बाजी’.
वन विभागाच्या नोंदींमध्ये या वाघांना सांकेतिक क्रमांकाने (एसटीआर-टी१, टी२, टी३) ओळखले जाते.
मात्र, पर्यटक आणि स्थानिक निसर्गप्रेमींमध्ये आपुलकी निर्माण व्हावी, वाघांविषयी प्रेमाची भावना वाढावी यासाठी वन विभागानेही ही स्थानिक नावे अधिकृतरीत्या मान्य केली आहेत.
छत्रपतींच्या काळातील सरदारांनी जशी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांत शौर्य दाखवले, त्याच धर्तीवर इथल्या वाघांनाही अशीच ओळख देण्यात आली आहे.
‘सेनापती’ (एसटीआर-टी१) हा वाघ पाच वर्षांच्या खंडानंतर 17 डिसेंबर 2023 रोजी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात नोंद झाली. त्यामुळे त्याला सर्वात आधी ‘सेनापती’ हे मानाचे नाव देण्यात आले. सध्या तो चांदोली राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरात आहे.
‘सुभेदार’ (एसटीआर-टी२) हा वाघ मूळचा कोल्हापूरच्या राधानगरी वन्यजीव अभयारण्यातला आहे. आश्चर्य म्हणजे 28 ऑक्टोबर रोजी त्याने तब्बल 100 किलोमीटरचा प्रवास करून सह्याद्री व्याघ्र प्रकल्प गाठला. त्याच्या या धाडसी प्रवासामुळे त्याला ‘सुभेदार’ हे नाव दिले गेले.
तिसरा वाघ ‘बाजी’ (एसटीआर-टी३) हा 2023 साली कोल्हापूरच्या कडगाव वनपरिक्षेत्रात प्रथम दिसला होता. 2025 मध्ये तो सह्याद्री प्रकल्पात दाखल झाला. या काळात तो कोकणातील चिपळूण वनपरिक्षेत्रापर्यंत जाऊन आला होता. त्याच्या या धडाडीच्या प्रवासामुळे त्याला ‘बाजी’ हे नाव मिळाले.